कंगनाच्या घराबाहेर गोळीबार? घराभोवती पोलिसांचा पहारा

1623

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. आपल्याला घाबरवण्यात येत असल्याचा दावा कंगनाने केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील घरी राहत आहे. तिच्या म्हणण्यानुसार गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमाराला तिच्या घराबाहेर बार ऐकू आले. आधी तिला ते फटाके असावेत असं वाटलं. मात्र, या मोसमात पर्यटक कुलुमध्ये येत नाहीत, त्यामुळे हा परिसर शांत असतो. त्यामुळे कंगनाने तिच्या सुरक्षा रक्षकाला बोलावलं. मात्र, त्याला कदाचित गोळीबाराचा आवाज नवीन असेल, म्हणून तो ते ओळखू शकला नाही, असं कंगनाचं म्हणणं आहे.

कंगनासोबत त्यावेळी चार अन्य कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर कंगनाने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कदाचित कुणीतरी वटवाघुळाला मारण्याचा प्रयत्न करत होतं. वटवाघुळांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. त्यामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्याला बोलवलं. मात्र, त्याने गोळीबार केला नसल्याचं म्हटल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे जाणूनबुजून मला घाबरवण्यासाठी केलं जात असल्याचा दावा कंगनाने केला आहे.

कंगनाच्या घराच्या आसपास अशा कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत, जे गोळीबार झाल्याची पुष्टी करू शकतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. फोरेन्सिक टीमलाही आसपास कुठेही काडतुस किंवा तत्सम वस्तू आढळलेल्या नाहीत. सध्या तिच्या घराशेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली जात असून पोलिसांनी कडक पहारा लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या