‘काँग्रेस नाही वाचली, तर देश नाही वाचणार’, कन्हैया आणि मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोघेही काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना कन्हैया कुमार म्हणाले आहे की, ‘मला असे वाटते की या देशातील काही लोक, ते फक्त लोक नाहीत, ते एक विचार आहे. ते या देशाची परंपरा, संस्कृती, मूळ इतिहास, वर्तमान आणि भविष्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठेतरी मी वाचले होते की तुम्ही तुमचा शत्रू निवडा, मित्र आपोआप बनतील. तर मी आता निवड केली आहे. आम्हाला लोकशाही पक्षात सामील व्हायचे आहे, कारण आता असे वाटते की जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही.’

कन्हैया कुमार पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला हे स्पष्ट करतो की पंतप्रधान देशात आजही आहेत, पूर्वीही होते आणि पुढेही राहतील. पण आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने संविधानाची प्रत दिली आणि आम्ही गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचे चित्र दिले. कारण आज या देशाला भगतसिंग यांच्या सारखे साहस दाखवण्याची गरज आहे. आंबेडकरांच्या समानतेची गरज आहे आणि गांधींच्या एकतेची गरज आहे.’

तसेच यावेळी बोलताना जिग्नेश मेवानी म्हणाले आहेत की, ‘मी एक अपक्ष आमदार आहे, म्हणून औपचारिकपणे काँग्रेसमध्ये सामील होऊ शकत नाही, मात्र या विचारासोबत राहणे महत्त्वाचे आहे आणि राहुलजी असे म्हणाले की, फॉर्म भरून सदस्य होणे हीच जर गोष्ट आहे. तर ती उद्याही करता येऊ शकते. आता तुम्ही तुमच्या मतदारसंघातील लोकांच्या पाठीशी उभे रहा.’ मेवानी म्हणाले, ‘2022 च्या निवडणुकीत मी काँग्रेसच्या चिन्हावर लढेल आणि त्यासाठी प्रचार करेन.’

आपली प्रतिक्रिया द्या