भाजपविरोधी शक्तींनी एकत्र येण्याची गरज – कन्हैया कुमार

सामना प्रतिनिधी । सोलापूर

गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने शिक्षण आणि रोजगाराबाबत कोणतेही ठोस काम केलेले नाही. फसव्या घोषणा करून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उक्ती आणि कृती वेगळी आहे. त्यामुळे आगमी काळात देशातील भाजपविरोधी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने व्यक्त केले.

रशियन क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीच्या वतीने सोलापुरात कन्हैयाकुमारच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

कन्हैया कुमार म्हणाला, सोलापूर शहरात एकेकाळी वस्त्रोद्योगाचे वैभव होते. मात्र, आज नवीन उद्योग उभारला जात नाही. कामगारांच्या हाताला काम नाही. देशातील जनता विविध समस्यांना तोंड देत आहे. पंतप्रधान मोदी विदेशात फिरत आहेत. मी मात्र देशभरात फिरून देशातील जनतेच्या समस्या जाणून घेत आहे. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील विचारवंत, पत्रकार विरोधी लिखाण करत असतील, तर त्यांची हत्या केली जाते. विचाराचा संघर्ष विचारांनीच झाला पाहिजे.

भाजपने पैशांचा वापर करून गुजरातमध्ये निवडणुका जिंकण्याचा चालविलेला प्रयत्न तेथील सुजाण जनताच हाणून पाडेल. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील लहान उद्योग उद्ध्वस्त झाले. बेरोजगारी वाढली आहे. भाजप भ्रष्टाचाराची गंगोत्री होत आहे. मुकुल रॉय, सुखरामसारख्या लोकांना भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे. यामुळे भ्रष्टाचार संपवू म्हणणाऱया भाजपाने भ्रष्टाचारी व्यक्तींनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. माझा मोदी यांना व्यक्तिगत विरोध नाही, त्यांच्या नितीला आणि विचारधारेला माझा विरोध आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाला.

यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, माकपचे राज्य सचिव नरसय्या आडम, कॉ. रा. गो. म्हेत्रस, कॉ. तानाजी ठोंबरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.