श्रीमंताची साथ अन् श्रीमंतांचाच विकास! कन्हैय्या कुमारची घणाघाती टीका

34

सामना ऑनलाईन, बीड

सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सबका साथ, सबका विकासचा नारा दिला. त्यामुळे लोकांनी मोदींना पंतप्रधानपदावर बसवले. पण सत्तेत आल्यानंतर सबका विकासचे उद्दिष्ट बाजूलाच राहिले असून श्रीमंताची साथ अन् श्रीमंतांचाच विकास केला जात आहे, अशी घणाघाती टीका ‘जेएनयू’तील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी मोदी सरकारवर आज केली. धर्म, जातीच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करून देशाला तोडण्याचे काम केले जात असल्याचे खंत कन्हैया कुमारने व्यक्त केली.

संविधान बचाव कृती समितीच्या वतीने बीडमध्ये संविधान बचाव रॅली आणि रोहित अ‍ॅक्ट परिषदेचे आयोजन केले होते. आशिर्वाद लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाला जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार उपस्थित होता. यावेळी बोलताना कन्हैया म्हणाला, देशात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांपाठोपाठ विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे संविधान बदलण्याच्या गोष्टी करू लागले आहेत. पण कुणालाही संविधानाला हात लावू देणार नाही, असा इशारा, कन्हैया कुमार याने दिला. विद्याथ्र्यांनी शिकले पाहिजे. शिकलो तरच लढता येईल. मोदी सरकार ‘एक हिंदुस्थान श्रेष्ठ हिंदुस्थान’ असा नारा देत आहेत. त्यांना आमची विनंती आहे की, या नाऱ्याप्रमाणेच देशात एक राष्ट्र, एक शिक्षण का नाही? असा सवालही त्याने केला.

माझे शत्रुत्व मोदींच्या विचारांशी

पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाही. माझे कोणत्याही व्यक्तीशी शत्रुत्व नाही. तर त्या व्यक्तीच्या विचारधारेशी माझे शत्रुत्व आहे. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचा अभिमान आहे. भगवा रंग महाराजांनीही अंगीकारला. पण तुकारामांचा भगवा हवा की, सरसंघचालक मोहन भागवत यांचा? हे आपल्याला ठरवावे लागेल. रामाचे नाव पुढे करून जाती धर्माच्या नावावर लोकांना तोडण्याचे काम सत्तेवर असलेले सरकार करत आहे,  असा आरोप कन्हैयाने केला.

अजूनही अच्छे दिन आले नाहीत

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात मोदींनी अच्छे दिन आयेंगे, असे आश्वासन देशातील जनतेला दिले. पण तीन वर्ष लोटली तरी, अच्छे दिन आलेले नाहीत. मोदीजी तुम्ही चहा विकल्याचे वारंवार सांगता. चहा टाकलेली साखर उसापासून तयार केली जाते आणि तो ऊस तोडण्याचे काम बीड जिल्ह्यातील मजूर करतात. या ऊसतोड मजूरांचाही विकास झाला पाहिजे, असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या