कांजूर डम्पिंगच्या विस्ताराचा फ्लेमिंगोवर काय परिणाम होईल? अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

237

मुंबईतील कचऱ्याची समस्या अपुऱ्या जागेमुळे वाढत असून कचरा साठवण्यासाठी कांजूरमार्ग डम्पिंगच्या विस्ताराचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या डम्पिंग ग्राऊंडची जागा वाढविल्यास तेथे येणाऱ्या फ्लेमिंगोवर त्याचा काही परिणाम होणार आहे का असा सवाल हायकोर्टाने  पालिका प्रशासनाला करत त्याबाबत सर्वेक्षण करून दोन आठवडय़ांत अहवाल सादर करण्याचे आदेश निरी आणि बीएनएचएसला दिले.

कांजूरमार्ग येथे  65 हेक्टर भूखंडावर पसरलेले डम्पिंग ग्राऊंड अपुरे पडत असल्याने हा भूखंड 121 हेक्टरपर्यंत वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. जागा ज्या बाजूने वाढविण्यात येणार आहे त्या ठिकाणी ठाणे खाडी असून या खाडीत फ्लेमिंगोंचा अधिवास आहे. त्यामुळे इको सेन्सेटिव्ह झोन आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत पर्यावरणवादी दयानंद स्टेलियन यांच्या वनशक्ती या संस्थेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड 2018 साली बंद केले असून त्याचा ताण देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर पडणार आहे ही बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने डिसेंबरमध्ये पालिकेला दिलासा देत डम्पिंग ग्राऊंडच्या विस्तारावर घातलेली स्थगिती उठवली होती. या निर्णयाविरोधात वनशक्तीने सर्वोच्च न्यायालयात डिसेंबर  2019 साली अपील केले होते. गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाला यात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या