मृत्यूची भीक मागणाऱ्या अभिनेत्रीने केली आत्महत्या, बाहुबलीतील अभिनेत्याने पूर्वी वाचवला होता जीव

फोटो सौजन्य- फेसबुक

कन्नड अभिनेत्री जयश्री रमय्या हिचा सोमवारी मृतदेह सापडला होता. बंगळुरुतील एका वृद्धाश्रमात ती मृतावस्थेत आढळून आली होती. तिने आत्महत्या केली असावी असा दाट संशय आहे. जयश्री ही गेली अनेक वर्ष नैराश्याचा सामना करत होती आणि ती जगण्याला कंटाळली होती असं आतापर्यंतच्या माहितीतून उघड झालं आहे.

जुलै 2020 मध्ये जयश्रीने फेसबुकवरून लाईव्ह केलं होतं. यामध्ये तिने तिच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या होत्या. या व्हिडीओमध्ये तिने आपल्याला मरण यावं यासाठी अक्षरश: गयावया केली होती. अभिनेत्री मृत्यूची भीक मागत असल्याचं पाहून कन्नड चित्रपटसृष्टी हादरली होती. ही बातमी अभिनेता सुदीपपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने जयश्रीचा जीव वाचवला होता. सुदीप हा बाहुबली चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. तो कन्नड बिग बॉसचा होस्ट असून जयश्री ही बिग बॉसची एक स्पर्धक होती.

गेल्या वर्षीच्या व्हिडीओमध्ये जयश्री म्हणाली होती की ” मी चालले आहे. या जगापासून आणि नैराश्यापासून मी निरोप घेते आहे. मी हे सगळं पब्लिसिटीसाठी करत नाहीये. मला सुदीप सरांकडून आर्थिक मदतही नकोय. मी नैराश्याचा मुकाबला करू शकत नाहीये त्यामुळे मला मरण यावं ही माझी इच्छा आहे.” जयश्रीने म्हटलं होतं की ती आर्थिकदृष्ट्या सबळ आहे, मात्र नैराश्याशी ती मुकाबला करू शकत नाहीये. वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी सुरू असल्याने आणि लहानपणापासून मला धोकेबाजीचा सामना करावा लागल्याने आपल्यावर ही वेळ आल्याचं तिने म्हटलं आहे. जयश्रीने या व्हिडीओमध्ये इच्छामरणाची भीक मागितली होती.

जयश्रीच्या या व्हिडीओनंतर बराच गदारोळ झाला होता. बहुधा या गदारोळामुळे जयश्रीने नंतर हा व्हिडीओ डिलीट केला होता. व्हिडीओ डिलीट केल्यानंतर तिने एक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये तिने अभिनेता सुदीप याचे आभार मानले होते. सुदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझा जीव वाचवल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे असं तिने म्हटलं होतं. चाहत्यांना चिंतेत टाकल्याबद्दल आपण त्यांची माफी मागत असून ज्या माध्यमांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानत असल्याचंही जयश्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या