उत्तरप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंदुस्थाविरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील अंतिमसामना सुरु असताना मुलाने टिव्ही बंद केल्याने संतापलेल्या बापाने मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केले आहे.
दीपक निषाद असे मुलाचे नाव असून आरोपी बापाचे गणेश निषाद असे नाव आहे. हिंदुस्थाविरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील अंतिमसामना बघण्यात गणेश तल्लीन होता. दीपकने वडिलांना जेवण जेऊन सामना बघण्यास सांगितले. पण गणेश त्यावेळी टीव्हीवर मॅच बघण्यात तल्लीन झाला होता. वडिलांचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नसल्याने संतापलेल्या दीपकने टीव्ही बंद केला. सामना बघण्यात तल्लीन असताना मुलाने टिव्ही बंद केल्याने त्यांच्यात वादावादी झाली. या वादाचे रुपांतर मारामारीत झाली. संतापाच्या भरात गणेशने विजेच्या तारेने मुलाचा गळा आवळून त्याची हत्या केली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गणेशने तिथून पळ काढला. कानपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चकेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) ब्रिज नारायण सिंह यांनी सांगितले की, दीपक आणि गणेश यांच्यामध्ये पूर्वीच्या दारू पिण्याच्या सवयीवरून वारंवार वाद होत होते. क्रिकेट मॅच पाहण्यावरून झालेल्या वादातून ही हत्येचे तात्काळ कारण असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.