कपिल शर्माची ट्विटरवरून प्रसारमाध्यमं आणि प्रशासनाला अश्लिल शिवीगाळ

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि वाद यांचे जुने नाते आहे. याच वादांमुळे त्याचा हिट शो देखिल बंद झाला. नवीन शो ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ला फॅन्सने जास्त प्रतिसाद मिळत असताना कपिलने नवा वाद ओढवून घेतला आहे. कपिलने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून प्रसारमाध्यमं आणि प्रशासनाला अश्लिल भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे. तसेच त्याने आपल्या ट्वीटमध्ये काळवीट प्रकरणात दोषी ठरण्यात आलेला आणि सध्या तुरुंगाची हवा खात असलेला सलमान खान निर्दोष असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हे सर्व ट्वीट डिलिट करण्यात आले  असून याप्रकरणी कपिलने ट्वीट करत माफी मागितली आहे. आपले अकाउंट हॅक झाल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

kapil-tweet1

कपिल शर्माने लागोपाठ ट्वीट करत हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमं आणि प्रशासन किती निष्फळ आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला. यात त्याने अश्लिल भाषेचाही वापर केला. ‘आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवण्यासाठी चांगल्या माणसाविरोधात नकारात्मक बातम्या छापू नका. तो (सलमान) एक चांगला माणूस आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच बाहेर येईल. खोटी बातमी छापण्यासाठी तुम्ही किती पैसे घेता? आताची पत्रकारिता ही विकलेली आहे, असे ट्वीट करत त्याने ‘स्पॉटबॉय’ या आघाडीच्या वेबसाईटला अश्लिल शिवीगाळही केली. तसेच ‘मी असे अनेक स्वतःला महाराज समजणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतः त्यांनी वाघाची शिकार केली हे मान्य करतात. मी अशा लोकांना भेटलोय. सलमान अनेकांची मदत करतो. तो एक खूप चांगला माणूस आहे. मला माहित नाही त्याने हे केले की नाही. पण माणसाची चांगली बाजूही पाहा. ही यंत्रणा फार वाईट आहे. मला माझे चांगले काम करु द्या.’

kapil-tweet

‘बातम्यांमध्ये नेहमीच सूत्रांच्या हवाल्यानुसार असा शब्द वापरला जातो. पण तुमचे सूत्र कोण आहेत ते तरी एकदा सांगा…’ असे म्हणत त्याने प्रसारमाध्यमांना शिवीगाळ केली. तसेच ‘मी जर पंतप्रधान असतो तर खोट्या बातम्या छापणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली असती, असेही ट्वीटमध्ये त्याने नमूद केले आहे. कपिलच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

kapiel-tweet2

आपली प्रतिक्रिया द्या