कापूरबावडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निलंबित

14

सामना प्रतिनिधी । ठाणे

विनयभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलेचा ‘तो’ व्हिडीओ पाहणे कापूरबावडी पोलिसांना महागात पडले आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करूनही सर्वत्र टीकेची झोड उठत असल्याने अखेर आज पोलीस आयुक्तांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. पी. पवार यांना निलंबित केले आहे, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. बारावकर यांचे एक महिन्याचे वेतन रोखले आहे. या कारवाईसोबतच महिलांसाठी पोलीस ठाण्यामध्ये एक मॉनेटरिंग सेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंघोळ करताना एका तरुणाने चित्रीकरण केल्याची फिर्याद घेऊन एक महिला कापूरबावडी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी पुरावा म्हणून आरोपीचा मोबाईल पोलिसांना देण्यात आला. मात्र या पुराव्याची गुप्तता न बाळगता पोलीस ठाण्यात हजर असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने तो आळीपाळीने पाहिला. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना खरमरीत पत्र लिहून तत्काळ कारवाईची मागणी केली. मात्र अब्रूची लक्तरे निघू लागल्याने पोलिसांनी त्या महिलेकडून ‘असे काही घडलेच नाही’ अशी लेखी जबानी घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यावरही टीका होऊ लागल्याने अखेर पोलीस आयुक्तांनी कारवाई करीत उपनिरीक्षकास निलंबित केले, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पगार रोखला. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांना जबाबदारी दिली होती. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ही कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या