कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणूकीबाबत कमालीची उत्सुकता

पश्चिम महाराष्ट्रातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम असताना नुकतीच मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. साखर संघ पुणे व कारखाना कार्यस्थळावर यादी एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली. यादीत 46 हजार 340 मतदारांचा समावेश आहे.

कृष्णा कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने 12 एप्रिल रोजी सभासदांची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यावर 22 एप्रिलपर्यंत हरकती घ्यायची मुदत होती. या कालावधीत 158 हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतींवर 27 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्याचा निकाल 3 मे रोजी जाहीर झाला .त्यात 130 हरकती फेटाळण्यात आल्या. फक्त 28 हरकती मंजूर करण्यात आल्या होत्या. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यात 46 हजार 340 पात्र मतदारांचा समावेश आहे.

दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार की स्थगिती मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोल्हापूर येथील गोकुळ दूध संस्थेची निवडणूक झाल्याने सदरची निवडणूक होईल असा कयास बांधला जात आहे. या निवडणुकीमध्ये तीन पॅनेल समोरासमोर असतील असे प्राथमिक चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांच्या गटांमध्ये निवडणूक होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या