भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

भाजपच्या भूलथापांना बळी न पडता पदवीधर आणि शिक्षकांनी महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार राजेश प्रा . जयंत आसगावकर यांना विजयी करा आणि मूळ विषय बाजूला ठेऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते उपस्थित होते.

मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात चांगले काम केले आहे. पदवीधर आणि शिक्षक आमदारकीसाठी ही निवडणूक वेगळी आहे. मतदारसंघही मोठा आहे. त्यामुळे उमदेवारांना सर्वच ठिकाणी पोचणे शक्य होत नाह . त्यामुळे कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत न्यावे. भाजपकडून दिशाभूल करणाऱ्या वल्गना केल्या जात आहे, त्याला बळी पडू नये.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधक वारंवार सरकारच्या विरोधात भाष्य करत आहेत. परंतु त्याकडे लक्ष न देता महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुणे पदवीधर मतदार संघ व पुणे शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. त्याचप्रमाणे पदवीधर व शिक्षक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या