कराड जनता सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध

सामना प्रतिनिधी । कराड

कर्जवसुली समाधानकारक नसल्याने रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. याबाबतचे पत्र कराड जनता बँकेला प्राप्त झाले आहे. यामुळे ठेवीदारांना बँकेतून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांनुसार कराड जनता सहकारी बँकेला नवीन ठेवी स्वीकारता येणार नाहीत. नवीन कर्जप्रकरण करायचे नाही व एक हजार रुपयांच्या वर कोणत्याही खातेदाराला पैसे काढता येणार नाहीत. २०१५-२०१६ सालातील कर्जाची वसुली समाधानकारक नसल्याकारणास्तव रिझर्व्ह बँकेने सदरची कार्यवाही केली आहे. कराड जनता सहकारी बँकेने मे २०१७ पर्यंत कर्जवसुलीत लक्षणीय सुधारणा केली आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असली, तरी गतकाळात १७ टक्क्यांनी ‘एनपीए’ वाढल्यामुळे बँक आर्थिक अडचणीत येऊ शकते, या कारणामुळे बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेने येत्या सहा महिन्यांत सुधारणा करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.

कराड जनता सहकारी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांचा कालावधी दिला असला, तरी बँक एक ते दोन महिन्यांतच यातून बाहेर पडेल. ठेवीदार, सभासदांनी अफवांना बळी पडू नये. – राजेश पाटील-वाठारकर, अध्यक्ष, कराड जनता सहकारी बँक.

आपली प्रतिक्रिया द्या