अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करा, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना

कमी दाबाच्या पट्टयामुळे गत चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून डोंगरी व दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले असून मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गत चार दिवसातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता. पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीसंदर्भात सर्व शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, पाटणचे तहसिलदार समीर यादव, कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण,तालुका कृषी अधिकारी डी.ए.खरात, पशुसंवर्धन अधिकारी जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, उपविभाग पाटणचे उपअभियंता अजित पाटील, विद्याधर शिंदे, जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता एन.डी. भोसले, जिल्हा परिषद बांधकामचे आर.एस.भंडारे, ग्रामीण पाणी पुरवठा‍ उपविभागाचे एम.आर.कदम यांची उपस्थिती होती.

अवकाळी व अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होवून पिकांची हानी झालेली आहे. शेतामध्ये  पाणी साठल्याने शेतातील पिके पुर्णत: कुजली असून या हंगामातील सोयाबीन, हायब्रीड, भुईमुग, भात,नाचणी व ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे. पाटण मतदारसंघ डोंगरी व दुर्गम भागातील अतिवृष्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतक-यांचे शेती हे एकमेव उदर-निर्वाहाचे साधन आहे. अल्पभूधारक शेतक-यांची संख्या असून सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे फार मोठया संख्येने आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसह अंशत: व पुर्णत: पडझड झालेल्या घरांचे तसेच पुल, रस्ते, नळ पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी इमारती, शाळा खोल्या आदींचे  झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव सादर करा, अशा सूचनाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी शासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या