करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार कंगना रणौत?

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यातला वाद तर जगजाहीर आहे. नेपोटिझमवरून एकमेकांवर यथेच्छ बोलून झाल्यानंतर आता कंगना आणि करण एकत्रित काम करू शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द करणनेच याचं सूतोवाच केलं आहे.

कॉफी विथ करणच्या एका भागात कंगनाने करणला मूव्ही माफिया म्हटलं आणि तिथून त्यांच्या वादाला सुरुवात झाली. करण हा नेपोटिझम करत असल्याचं आणि फक्त बॉलिवूडची पार्श्वभूमी असलेल्यांनाच त्याच्या चित्रपटात काम देत असल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यावर करणने तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यात विस्तव जात नव्हता. पण आता चित्र काहीसं बदललं आहे. नुकतंच एका मुलाखतीत करणला त्याच्या धर्मा प्रॉडक्शन्सचा कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता याने कंगनाबाबत प्रश्न विचारला होता. कंगनासोबत काम करायला आवडेल का? या प्रश्नाला करणने हो का नाही, ती आजच्या पिढीची एक उत्तम अभिनेत्री आहे, असं उत्तर दिलं होतं.

या उत्तरानंतर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या असल्या तरी खुद्द कंगनाला मात्र याचा पत्ता नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे ती यावर काय प्रतिक्रिया देते ते पाहण्यासारखं असणार आहे. कारण, त्यावरच या दोघांचं एकत्रित काम करणं अवलंबून असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या