… म्हणून वयाने 10 वर्ष मोठ्या सैफशी लग्न केलं, करीनाचा खुलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने सैफ अली खानशी लग्न का केले याचा खुलासा लग्नाच्या सात वर्षानंतर केला आहे. सैफ आणि करीनाचे 12 ऑक्टोबर, 2012 रोजी लग्न झाले होते. करीनाने तिच्या वयापेक्षा 10 वर्ष मोठ्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या सैफचा हात हाती घेतल्याने ती ट्रोलही झाली होती. परंतु आपला हा निर्णय योग्य होता असे तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितले.

मुलाखतीदरम्यान तिला सैफ आणि तैमूरबाबत प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान तिला लग्नाबाबत विचारण्यात आले असता तिने सांगितले की, ‘सैफ अली खानने बॉलिवूडमध्ये माझे वाईट दिवस सुरू असताना माझी साथ दिली आणि माझ्यावर मनापासून प्रेम केले. बॉलिवूडमध्ये मी कामासाठी झुंज देत असताना सैफने माझा हात हाती घेतला. त्यावेळी त्याच्या पाठींबा आणि समर्थनाच्या बळावर मी उभी राहिली.’ तसेच दोघांमधील वयाच्या अंतराबाबत प्रश्न विचारला असता करीनाने सांगितले की, तो माझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा होता आणि दोन मुलांचा बाप होता, परंतु माझ्यासाठी तो फक्त सैफ होता. आमच्या दोघांमध्ये वयाचे अंतर जास्त आहे हे खरे असले तरी तो एक चांगला माणूस आहे.

करीनाने यावेळी एक किस्सा सांगितला. आम्ही एकमेकांना डेट करत असताना सैफने सांगितले की, मी 25 वर्षाचा तरुण नाही आणि मी रोज रात्री तुला ड्रॉप करू शकत नाही. तसेच याचवेळी त्याने माझ्या आईला सांगितले की, करीनासोबत मला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे. सैफच्या मागणीला आईने देखील पाठींबा दिला आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. तसेच आता आपण तैमूर आणि सैफशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही, असेही करीना यावेळी म्हणाली.

सैफसोबत गुटरगू कधी सुरू झाले याला उत्तर देताना करीना म्हणते, आम्ही याआधी एकत्र काम केले होते. परंतु ‘टशन’ चित्रपटादरम्यान आम्ही एकमेकांचा जास्त जवळ आलो. मी त्यावेळी त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होते. लडाख आणि जैसलमेरमध्ये शुटिंग सुरू असताना आम्ही बाईक राईडला जात होतो. आम्हाला एकमेकांचा सहवास आवडत होता आणि आम्ही त्याचा आनंद लूटत होतो, असेही ती म्हणाली.