मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याने माझी बोली लावली होती! करिश्मा कपूरचा गौप्यस्फोट

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. उत्तम अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही तिने अनेकांना घायाळ केले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना करिश्माने लग्नाचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणं जवळपास थांबवलं होतं. लग्नानंतर तिला काय यातना सहन कराव्या लागल्या होत्या, त्याचा पाढा तिने आयबी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वाचला आहे. यातील सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की मधुचंद्राच्या रात्री तिचा पूर्वाश्रमीचा नवरा संजय कपूर याने मधुचंद्राच्या रात्री तिची बोली लावली होती. या बोलीमध्ये त्याने त्याच्या मित्रांना सामील केलं होतं असं करिश्माने सांगितलं आहे.

संजय कपूरसोबत लग्नापूर्वी करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रेमप्रकरणाची जबरदस्त चर्चा सुरू होती. असं सांगितलं जातं की त्यांचा साखपुडाही ठरला होता, मात्र काही कारणाने त्यांचे लग्न मोडले. करिश्माने 29 सप्टेंबर 2003 रोजी दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. अकरा वर्षाच्या संसारानंतर दोघांनी 2014 रोजी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या चार वर्षानंतर करिश्मा कपूरने एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केले आहेत.  करिश्माने म्हटलंय की तिची सासू तिच्यावर हात उगारायची आणि तिचा नवरा संजय हा तिच्या सगळ्या खर्चाची माहिती भावाला द्यायचा.

करिश्माने मुलाखतीत सांगितले होते की, संजयने तिच्याशी केवळ ती एक बॉलीवूडची मोठी अभिनेत्री असल्याने लग्न केले होते. ‘जेव्हा दोघं हनिमूनला गेले तेव्हा संजयने त्याच्या मित्रांनाही तिथे बोलावून तिची बोली लावली होती आणि त्यांच्यासोबत एक रात्र घालवण्यास भाग पाडले होते. ‘संजय मला मारहाण करायचा. मारहाणीचे डाग लपवण्यासाठई मी मेकअप करायचे’ असं करिश्माने म्हटलं आहे. मात्र जेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे गेल्या त्यावेळी माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नाही आणि मी तक्रार करायचं ठरवलं असं करिश्माने म्हटलंय.  अखेर करिश्माने संजय व त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार केली होती.

करिश्माच्या घटस्फोटानंतर वडील रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना स्वत:ला करिश्मा आणि संजयचे लग्न मान्य नव्हते. ‘आमच्या कुटुंबाबद्दल सर्वांना माहिती आहे. आम्ही कपूर आहोत, आम्हाला कोणाच्याही पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही. आमच्याकडे केवळ पैसेच नाही तर टॅलेण्ट पण आहे. ज्यातून आम्ही आयुष्यभर कमावू शकतो. संजय हा वाईट माणूस आहे. करिश्माने त्याच्याशी लग्न करावे अशी माझी कधीच इच्छा नव्हती. त्याने कधीच आपल्या बायकोची पर्वा केली नाही. तो सतत तिचा अपमान करायचा आणि दुसर्‍या महिलेसोबत राहत होता. तो कसा माणूस आहे हे संपूर्ण दिल्लीला माहित आहे, याबाबत आणखी काही बोलायची गरज नाही’ असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. संजय कपूरने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यामध्ये आरोप केला होता की करिश्मा चांगली आई नव्हती आणि तिने फक्त पैशासाठीच आपल्याशी लग्न केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या