कर्मयोग

991

<< प्रतिमा ओतूरकर >>

देवाला नवस बोलणं ही आम बाब… पण या इच्छेला जेव्हा
प्रयत्नांची जोड मिळते तेव्हा ती इच्छा फलद्रुप होतेच.

हिंदुस्थानी मुळातच श्रद्धाळू असतात. देव या संकल्पनेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. संकट आले की आपल्या दैवताच्या उपासनेने, नामस्मरणाने मानसिक बळ मिळते, आधार मिळतो व संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नात भर पडते ही श्रद्धा… आणि श्रद्धा ही डोळस हवी. पण संकटाच्या वेळी देवाला नवस बोलणे हे कितपत योग्य… यावर मतमतांतरे असू शकतात. देवाला ‘माझे हे काम कर’ अशी करूणा भाकणे, मागणी करणे, प्रार्थना करणे यात काहीच चूक नाही. परंतु संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची जोड हवीच.

आज आपल्या देशातच नव्हे तर जगात आर्थिक विषमता आहे. लाखो बालके कुपोषित आहेत. हाच पैसा जर अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना दान केला तर देवदेवतांनाच दिल्यासारखा होईल ना! देवावर श्रद्धा ठेवल्याने माणसाला मानसिक बळ मिळते. देव आपल्या बऱया-वाईट वागण्याचा लेखाजोखा ठेवतो व त्याप्रमाणे फळ देतो या विश्वासातून माणूस अधिकाधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. संकटावर मात करण्याचे बळ भक्तीतून मिळते. आपल्या चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळेल या विश्वासाने तो नीतीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवाला मनोभावे नमस्कार करावा, नतमस्तक व्हावे. यश मिळविण्यासाठी जरूर तितके प्रामाणिक प्रयत्न करावे आणि निर्धास्त राहावे. चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा व तो प्रयत्नाने तडीस न्यावा. हीच खरी भक्ती. हीच खरी श्रद्धा.
एखादे काम व्हावे असे आपल्याला वाटणे किंवा परीक्षेत पास व्हावे यासाठी देवाला नवस बोलून ‘मी तुला हे काम झाले तर एवढे किलो पेढे देईन वा इतके सोने देईन’ असे देवालाच आमीष दाखविणे हे कितपत योग्य आहे? गणेशोत्सवाच्या काळात अमुकच एक गणपती नवसाला पावतो म्हणत रांगेत उभे राहायचे, त्यातही सेलिब्रिटींची वेगळी रांग आणि सामान्य भक्तांसाठी वेगळी रांग बघून हसावे की रडावे तेच कळत नाही.

प्रयत्नांची जोड हवीच!
काम होण्यासाठी वा परीक्षेत पास होण्यासाठी नवस बोलून देवालाच आमीष दाखविले जाते. पण आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची जोड हवीच. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे खरे आहे. ‘दे हरी खाटल्यावरी’ ही धारणा चुकीचीच. नवस पूर्ण झाला म्हणून एका भक्ताने सोन्याचे सिंहासन एका देवाला अर्पण केले किंवा सोन्याचा मुकूट दिला अशी बातमी वाचतो. नवस पूर्ण झाला म्हणून लाखो रुपये एखाद्या मंदिरात दान केले जातात. हे कशाचे प्रदर्शन आहे? भक्तीचे वा श्रद्धेचे अजिबात नाही. यातून त्या व्यक्तींची मानसिक दुर्बलताच दिसून येते.

आपली प्रतिक्रिया द्या