पारंपरिक मच्छीमारांची जाळी समुद्रात तोडली, परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ

114

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ सुरू झाला आहे. मालवण समुद्रात मासेमारी करत असताना कर्नाटक मलपी येथील सुमारे 25 ते 30 हायस्पीड ट्रॉलर्सने सर्जेकोट येथील पारंपारिक मच्छीमारांच्या श्री स्वामी समर्थ मच्छीमारी नौकेला घेरले. या नौकेने समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली सुमारे 22 छोटी जाळी कापून टाकत दहशत माजवल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, समुद्रातील परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सने माजविलेल्या या दहशतीच्या प्रकारामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये घबराट पसरली आहे. यात स्वामी समर्थ पातीचे मालक मिलन आचरेकर यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

समुद्री वादळ, हवामान बदल, मत्स्यदुष्काळ या संकटांबरोबरच मानवनिर्मित संकटांशी पारंपारिक मच्छीमार संघर्ष करत आहेत. किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट सुरू असताना मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे दर्याचा राजा मच्छिमार हवालदिल झाला आहे.  मालवण तळाशील येथील बल्यावधारक मच्छीमार दशरथ कोचरेकर यांची गिलनेट पद्धतीची जाळी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. यात मच्छीमारांचे सुमारे सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा जाळी तोडून नेण्याचा प्रकार घडला. सर्जेकोट येथील श्री स्वामी समर्थ या पातीने कृष्णा आचरेकर, किरण आचरेकर, सुरेश सारंग हे मच्छीमार शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यास गेले होते. समुद्रात 12 वाव मध्ये गिलनेट पद्धतीने मासेमारी करत असताना काही अंतरावर कर्नाटक मलपी येथील सुमारे शंभर पेक्षा जास्त हायस्पीड ट्रॉलर्स मासेमारी करत असल्याचे स्थानिक मच्छिमारांना दिसून आले. यावेळी स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाळी मारून ठेवली होती. काही क्षणात पावसाचे आगमन झाले. त्यावेळी मच्छीमारांनी पावसापासून बचावासाठी नौकेत ताडपत्रीचा आधार घेतला असतानाच सुमारे 25 ते 30 हायस्पीड ट्रॉलर्सनी आचरेकर यांच्या पातीला घेरले. व समुद्रात टाकलेली जाळी कापून टाकत पोबारा केला. यामध्ये 22 जाळ्यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मच्छीमारांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

मला साथ द्या, कडक कारवाई करतो : मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त
भर समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सना पकडणे फार जोखमीचे काम असते. हायस्पीड ट्रॉलर्सपुढे मत्स्य विभागाच्या एकट्या गस्तीचा टीकाव लागत नाही. त्यांच्याकडून गस्ती नौकेला घेरण्याचाही प्रयत्न केला जातो. तरी स्थानिक मच्छीमारांनी स्वतःचे ट्रॉलर्स आमच्या सोबतीला द्यावेत. जेणेकरून आम्ही कडक कारवाई करू, असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी मच्छीमारांना केले.

बेकायदेशीर मासेमारी बंद झालीच पाहिजे
मत्स्य अधिकारी वस्त यांनी रविवारी पारंपरिक मच्छीमारांना स्वतःहून चर्चेसाठी बोलाविले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, महेंद्र पराडकर, संतोष देसाई, नितीन परूळेकर आदी उपस्थित होते. मच्छीमारांनी मत्स्य विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मात्र हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनच्या बेकायदेशीर मासेमारी बंद झालीच पाहिजे, असे मच्छीमारांनी स्पष्ट केले. तसेच मत्स्य विभागाने पोलिसांकडून संरक्षण घ्यावे, असे आवाहन मच्छीमारांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या