कर्नाटक – पराभवाची नैतिक जबाबदारी घेत माजी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

कर्नाटकात 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 10 जागांवर विजय मिळवला असून दोन जागांवर ते आघाडीर आहेत. काँग्रेसने 2 जागा जिंकल्या आहेत, तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. भाजपने 10 जागा जिंकल्याने कर्नाटकातील बी. एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, या पराभवामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते एस. सिद्धरमय्या यांनी राजीनामा दिला आहे.

पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत आणि लोकशाहीचा सन्मान राखत आपण राजीनामा देत असल्याचे सिद्धरमय्या म्हणाले. सिद्धरमय्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. यासह त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.

सिद्धरमय्या यांच्यासह कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडु राव यांनी देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली होती. उमेदवारांच्या निवड करण्यातही माझी महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे. तसेच यापुढेही पक्षासाठी काम करत राहणार आहे, असे गुंडू राव यांनी स्पष्ट केले.

भाजपचे सत्तेचे स्वप्न पूर्ण
काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजपने सत्तेचे स्वप्न पूर्ण केले होते. आता 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर या सत्तेचे भवितव्य ठरणार होते. त्यासाठी भाजप म्हणजेच येदियुरप्पा सरकाराने कंबरकसली होती. अखेर भाजपला पोटनिवडणुकीत मोठे यश मिळाले असून त्यांनी आतापर्यंत 10 जागांवर विजय मिळवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या