मोठी बातमी – ‘सेक्स स्कॅंडल’मध्ये अडकलेल्या भाजप मंत्र्याचा अखेर राजीनामा

‘सेक्स स्कॅंडल’मध्ये अडकलेले कर्नाटकचे जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोली (Ramesh Jarkiholi) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जारकीहोली यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

जारकीहोली यांनी आपल्या राजीनामापत्रामध्ये म्हटले की, ‘माझ्यावरील आरोप सत्यापेक्षा कोसो दूर आहेत. मी या प्रकरणात निर्दोष सिद्ध होईल असा मला विश्वास आहे. परंतु नैतिक आधारावर मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’

दरम्यान, जारकोली यांचा एक व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एका तरुणीसोबत अश्लील वक्तव्य करताना तसेच शारीरिक सुखाची मागणी करताना दिसत आहेत. नोकरी देण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी त्यांनी केली होती. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहाली यांनी बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली होती आणि पीडितेला सुरक्षा देण्याची मागणी केली होती.

‘पीडित महिलेला तिची ओळख जाहीर करायची नाही. त्यामुळे तिने मला तिच्या वतीने पोलिसांत तक्रार द्यायला सांगितले आहे. मंत्री जारकीहोली यांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीला एक लघु चित्रपट बनवायचा होता. तिने तसे मंत्र्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी किला कर्नाटक पॉवर ट्रान्समिसन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीचे आश्वासन देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र जेव्हा त्यांच्यातील त्या क्षणांचे काही व्हिडीओ तरुणीकडे असल्याचे मंत्र्यांना कळाले तेव्हा त्यांनी तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली’, असे कल्लाहाली यांनी सांगितले.

‘पीडितेने मला मंत्र्यांचे व तिचे व्हिडीओ असलेली सीडी दिली आहे. मंत्र्यांविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून मत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करावा व तरुणीला पोलीस सुरक्षा द्यावी’, अशी मागणी कल्लाहाली यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या