मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता

20

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

विधानसभेत मध्यरात्रीपर्यंत ‘नाटय़’ रंगले पण कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. दरम्यान, कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपादाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी विश्वासदर्शक ठरावावर कर्नाटक विधानसभेत चर्चेला सुरुवात झाली. चर्चा तिसऱ्यांदा होत आहे. यापूर्वीही गेल्या आठवडय़ात गुरुवार आणि शुक्रवारी विश्वासदर्शक ठरावावर चर्चा झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्या टेबलावर राजीनामा ठेवला आहे. कोणत्याही क्षणी ते राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोशल मीडियात तर कुमारस्वामी यांनी राजीनामा राज्यपालांकडे सोपविल्याचे वृत्त पसरले. यावर खुलासा करताना कुमारस्वामींनी हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे. परंतु विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता कुमारस्वामी राजीनामा देण्याचीच दाट शक्यता आहे.

सत्ताधारी आमदारांची घोषणाबाजी

सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस आमदारांनीच सभागृहात घोषणाबाजी केली. जोपर्यंत बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेऊ नये अशी या आमदारांची मागणी होती, मात्र लोकसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आजच सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे असा पवित्रा घेतला. आज मध्यरात्रीपर्यंत सभागृह चालविण्यास मी तयार आहे. सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे आहे. मला बळीचा बकरा बनवू नका, असेही रमेश कुमार यांनी बजावले.

चर्चेचे गुऱहाळ सुरूच

मध्यरात्रीपर्यंत कर्नाटक विधानसभेत चर्चेचे गुऱहाळ सुरूच होते. सत्ताधारी आमदार ‘संविधान बचाव’ अशा घोषणा देत ठरावाला विरोध करीत होते. दरम्यान, अध्यक्ष रमेश कुमार यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्याशी आपल्या दालनात चर्चा केली.

बंडखोर आमदारांना नोटीस बजावली

विधानसभेत या सर्व घडामोडी सुरू असतानाच अध्यक्ष रमेश कुमार यांनी 15 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. आज सकाळी 11 वाजता आपल्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना रमेश कुमार यांनी दिली आहे.

कितीही वेळ लागू द्या; आजच निर्णय घ्या – येडियुरप्पा

कितीही वेळ लागू द्या. आम्ही सभागृहात थांबायला तयार आहोत. पण विश्वासदर्शक ठरावावर आजच निर्णय झाला पाहिजे. कुमारस्वामी सरकारचा आज शेवटचा दिवस आहे, असा आक्रमक पवित्रा भाजप नेते येडियुरप्पा यांनी घेतला.

अपक्ष आमदारांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही

विश्वासदर्शक ठरावावर सोमवारी सायंकाळी 5 पर्यंत मतदान घ्यावे या मगाणीसाठी कर्नाटकातील दोन आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी केली, मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तत्काळ सुनावणीस नकार दिला. आता उद्या (दि. 23) याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या