मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोरच फोडले 16 मोबाईल

7436

मोबाईल आणि स्मार्टफोन ही आता काळाची गरज झाली आहे. जेवताना, झोपताना, चालताना प्रत्येकाला हाताशी मोबाईल हवा असतो. पण आता याच मोबाईलचे व्यसन शाळा कॉलेजपर्यंत जाऊन पोहचले आहे. कर्नाटकमधील एका कॉलेजमध्ये शिक्षक वर्गात शिकवत असताना विद्यार्थी मोबाईलमध्ये बिझी होते. हे बघून संतप्त झालेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोरच हातोड्याने 16 मोबाईल फोडल्याची अजब घटना घडली आहे. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी हाच मार्ग असल्याचा दावाही या प्राध्यापकांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कर्नाटकच्या एमईएस चैतन्य पीयू कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थी वर्गात मोबाईल घेऊन येत असल्याच्या तक्रारी प्राध्यापकांनी कॉलेज प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे यापुढे वर्गात मोबाईल दिसल्यास तो फोडला जाईल अशी ताकीद विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. पण विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी वर्गात मुख्याध्यापकांचे लेक्चर सुरू होते. पण विद्यार्थ्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. ते मोबाईलवर चॅटींग करण्यात दंग होते. हे बघून मुख्याध्यापकांचा रागाचा पारा चढला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले. नंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या हॉलमध्ये जमा होणाच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थी हॉलमध्ये येताच मुख्याध्यापकांनी हातोडी मागवली व सगळ्यांच्या समक्ष जप्त केलेले 16 मोबाईल फोडले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान कर्नाटकमधील अनेक शिक्षण संस्थांनी मुख्याध्यापकांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.तसेच हल्ली शाळा कॉलेजमधील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे दंड गरजेचे असल्याचे एमईएस चैतन्य पीयू कॉलेजचे महासचिव डी शशिकुमार यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या