‘या’ कारणाने तरुणाने केले दोनजणींशी लग्न; नवरदेवाला अटक

कर्नाटकातले एक लग्न सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरले आहे. एका तरुणाने एकाच मांडवात एकाचवेळी दोन सख्ख्य़ा बहिणींशी लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या लग्नाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि नवरदेव अडचणीत आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाला अटक केली असून दोन्हीकडच्या मंडळींचा शोध सुरु आहे.

कर्नाटकातील कोनार जिल्ह्यातील ही घटना आहे. उमापती असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. उमापती हा नात्याने मुलींचा मामा लागतो. उमापतीला ललिताशी लग्न करायचे होते. त्याबाबत त्याने मुलीच्या घरच्य़ांना सांगितले. मात्र मुलीच्या आई-वड़िलांनी त्याला तिच्यासोबत लग्न करण्यासाठी अट घातली. अट अशी होती की ललिताला सुप्रिया नावाची मोठी बहिण आहे, जी मुकी आणि कर्णबधिर आहे.उमापतीने तिच्याशीही लग्न करावे, अशी अट त्यांनी घातली.  उमापतीने ती अट मान्य केली. ललितानेही लग्नासाठी होकार दिला. दोन्ही घरात लगीनघाई सुरु झाली. 7मे रोजी उमापतीचे एकाच मांडवात एकाचवेळी या दोन्ही बहिणींशी लग्न झाले आणि लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले.

व्हायरल फोटोमुळे उमापती अडचणीत आला. पोलिसांनी उमापतीला अटक केली आहे. दोन लग्ने करणे बेकायदा आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच ललिता अल्पवयीन असून ती केवळ 17 वर्षांची असल्याची माहिती तालुका बालकल्याण विभाग अधिकाऱ्यांनी दिली. तसेच हे लग्न करताना कोरोनाच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे. लग्नासाठी परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उमापतीला अटक करण्यात आली आहे.

कायद्यानुसार हे लग्न अवैध आहे. दोन लग्न करणं गुन्हा आहे. आरोपी उमापतीने एकाचवेळी दोन लग्न केली आहेत. हिंदू विवाह कायद्यानुसार दोन्ही मुलींचे विवाह अवैध आहेत. दोषी आढळल्यास उमापतीला बाल विवाह निरोधक 1979नुसार 3 महिन्याच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. एवढेच नाही तर भारतीय दंड नियमानुसार जन्मठेची शिक्षा होऊ शकते. तसेच
अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध असल्यास तो बलात्कार मानला जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिवक्ता धनंजय यांनी दिली.

सोशल मीडियावर या लग्नासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही लोक या लग्नाकडे सकारात्मकतेने बघत आहेत. उमापतीने दिव्यांग तरुणीशी लग्न करून चांगले काम केले आहे. तर काहीजण हे चुकीचेच असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.उमापती सध्या तुरूंगात आहे. त्याचे आईवडील, सासरची मंडळी, लग्न लावणारे पुजारी, लग्नाची कार्डे छापणारे प्रिंटर हे सर्व फरार आहेत आणि पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी एक पथक तयार केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या