
कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही पक्षांच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे.
डीके शिवकुमार यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, काँग्रेस पक्षाच्या सर्वेक्षणात त्यांना राज्यातील एकूण 224 विधानसभा जागांपैकी 140 हून अधिक जागा जिंकल्याचं सांगण्यात आलं आहे. यादरम्यान डीके शिवकुमार यांनी असा दावा केला की येत्या काही दिवसांत भाजपचे अनेक आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
भाजपचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरचे माजी महापौर काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत होते. या नेत्यांमध्ये कोल्लेगलचे आमदार जीएन नंजुनदास्वामी, विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापूर आणि म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांचा समावेश आहे.
2022 च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला कर्नाटकात लगेच निवडणुका घ्यायच्या होत्या, पण नंतर ते मागे हटले, असा दावाही शिवकुमार यांनी केला. ते म्हणाले, ‘अनेक नेते पक्षात दाखल होत आहेत, काही दिग्गज नेते सहभागी होत आहेत. जनतेचा पाठिंबा काँग्रेसच्या बाजूने आहे हे अगदी स्पष्ट आहे.’
ते म्हणाले, ‘आमच्या आधीच्या सर्वेक्षणात आम्हाला 136 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, आता आमचे सर्वेक्षण आम्हाला 140 जागा मिळण्याचा दावा करत आहे. बदलाला सुरुवात झाली आहे.’
शिवकुमार पुढे म्हणाले, ‘भाजपला असे वाटते की जितके जास्त दिवस मिळतील तितके ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. म्हणूनच ते असा प्रयत्न करताहेत. दररोज अल्प मुदतीच्या निविदा काढल्या जातात, आगाऊ रक्कम दिली जात आहे, कंत्राटे दिली जात आहेत आणि कोणताही विचार न करता पैसे सोडले जात आहेत.’