खुर्चीचा खेळ कर्नाटकात, ‘पकडापकडी’ मुंबईत

26
mumbai-bengluru-police-team

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्नाटकचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्तेच्या खुर्चीचा खेळ कर्नाटकात सुरू असला तरी पकाडापकडी मुंबईत रंगल्याची दिसत आहे. विशेष म्हणजे या राजकीय खेळात बेंगळुरू पोलीस आणि मुंबई पोलीस एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहे. मुंबईतील रुग्णालयात भरती असलेले काँग्रेस आमदार श्रीमंत पाटिल यांना भेटण्यासाठी बेंगळुरू पोलीस येथे दाखल झाली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी बेंगळुरू पोलिसांच्या पथकाला आमदार श्रीमंत पाटील यांना भेटण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बेंगळुरू पोलिसांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

कर्नाटक विधानसभेत गुरुवारी विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली. मात्र यावेळी काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. याप्रकरणी काँग्रेसने आरोप करताच कर्नाटकातून गायब झालेले एक आमदार मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष्यांनी त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानुसार बेंगळुरू पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले. मात्र मुंबईत दाखल झालेल्या पोलीस पथकाला श्रीमंत पाटील यांची भेट घेण्यापासून मुंबई पोलिसांनी रोखले. यामुळे पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

या आधी कर्नाटकातील बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी शिवकुमार मुंबईत आले होते. या आमदारांनी भेटायला नकार दिल्याने शिवकुमार यांची पंचाईत झाली होती. शिवकुमार यांनी या हॉटेलमध्ये खोली बुक केली होती, मात्र हॉटेल प्रशासनाने ऐनवेळी त्यांना बुकींग रद्द केल्याची माहिती दिली. तसंच कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सुट मिळालेले काँग्रेसचे बंडखोर आमदार विधानसभेत गैरहजर राहिले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर भाजप खोटं बोलत असल्याचे सांगत काँग्रेस-जेडीएसने आपल्याकडे योग्य पाठबळ असल्याचा दावा केला. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली.

आपली प्रतिक्रिया द्या