भाजपचा खोटारडेपणा उघड – काँग्रेस

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीनंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या काँग्रेससाठी आज दिवस दिलासा दायक ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली १५ दिवसांची मुदत कमी करून शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काँग्रेसने या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय म्हटले आहे. तसेच भाजपने राज्यपालांना दिलेल्या यादीत कोणत्याही समर्थक आमदारांची नावे नाहीत हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, त्यामुळे त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.

‘आज सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक अंतरिम आदेश दिला आहे. याअंतर्गत काही प्रमुख आदेश दिले आहेत. ज्यामध्या भाजपला कर्नाटकमध्ये जास्तवेळ न घेता तात्काळ म्हणजेच उद्या (शनिवारी) ४ वाजता बहुमत सिद्ध करावे. तसेच या काळात येडियुरप्पा कोणतेही धोराणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत. या सोबतच कोणत्याही अँग्लो इंडियन आमदाराला बहुमत सिद्ध करण्याआधी नियुक्त करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत’, अशी माहिती काँग्रेसचे वकील अभिषेक मून सिंघवी यांनी दिली. या निर्णयासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.

राज्यपालांच्या निर्णयावर सुनावणी होणार!

कर्नाटकात राज्यपाल वजुभाई वाला यांनी काँग्रेस-जेडीस यांच्या युतीच्या घोषणेनंतर देखील मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. या राज्यापालांच्या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यावर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने १० आठवड्यांनंतरची तारीख दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या