राज्यभरात प्रचंड उद्रेक; छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात संतापाची लाट

1430

मराठी भाषकांच्या द्वेषातून सूडबुद्धीने सीमा भागातील ‘मनगुत्ती’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटवणाऱ्या कर्नाटकच्या येडीयुरप्पा सरकारच्या उद्दामपणाविरोधात आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उद्रेक झाला. ठिकठिकाणी येडीयुरप्पा सरकारच्या पुतळ्यांना ‘जोड्यां’चा प्रसाद देऊन दहन करण्यात आले. कर्नाटक सरकारविरोधात गगनभेदी घोषणा देत तीव्र निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगाव जिह्यात मनगुत्ती येथे शिवरायांचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा आहे. मात्र शनिवारी कर्नाटकमधील भाजप सरकारने पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवल्याचे समोर आले. ही बातमी पसरताच सीमाभागासह मुंबई-महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सीमाभागातील मराठी भाषकांनी कालपासूनच कर्नाटक सरकारचा निषेध करीत आंदोलन सुरू केले आहे. शिवभक्तांच्या संतापाची लाट आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असून ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारने शिवरायांचा पुतळा तातडीने होता त्या स्थितीत बसवावा, अशी जोरदार मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.

नागपुरातही महाल परिसरातील गांधी गेटजवळील महाराजांच्या पुतळय़ासमोर तीक्र आंदोलन करण्यात आले. तसेच शिर्डी, यवतमाळ, जालना, धुळे, हिंगोली, वाशिममध्ये शिवसैनिकांकडून निषेध करीत कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील आयबीपी पेट्रोल पंप ते दुधगंगा नदी पुलावर (कोगनोळी टोल नाका) धडक देऊन, कर्नाटक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.

जयसिंगपूर क्रांती चौकात आणि हुपरीत शिवसेनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोहोळ तालुक्यातील कामती बु. येथेही निषेध व्यक्त करण्यात आला.

मुंबईत जोरदार आंदोलन

शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेत्या मीनाताई कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटक जयश्री बाळलीकर, युवासेना सचिव दुर्गा शिंदे व सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी सामील झाले होते.

येडीयुरप्पा सरकारचा शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, सुनील मोरे, विलास पवार, विजय पडवळ, संजय दरेकर, प्रभाग समिती अध्यक्ष परमेश्वर कदम आणि शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

विलेपार्लेत जोरदार निषेध

शिवसेना विलेपार्ले विधानसभा क्षेत्राच्या वतीने शिवरायांचा अवमान करणाऱया कर्नाटकच्या भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संघटक सुभाष सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनप्रसंगी विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, राजा ठाणगे आदी उपस्थित होते.

शिवसेनेकडून दक्षिण मुंबईत निषेध

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 11 च्या वतीने येडीयुरप्पा सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक-शिवप्रेमींनी येडीयुरप्पा सरकारचा निषेध केला. यावेळी नगरसेविका श्रद्धा जाधव, उपविभागप्रमुख गजा चव्हाण, विजय कामतेकर, सुधीर साळवी, विजय लिपारे यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

कांदिवलीत शिवसेनेने जोडे मारले, काळे फासले!

शिवसेना कांदिवली विभाग क्र. 2च्या वतीने विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी विधानसभा संघटक संतोष धनावडे, पुरुषोत्तम मोरे, उत्तर भारतीय प्रमुख ऍड. कमलेश यादव, नगरसेवक शंकर हुंडारे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱया कर्नाटक सरकारचा शिवसेना कलिना विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी येडियुरप्पा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विभाग संघटक संजना मुणगेकर यांच्यासह शिवसैनिक-पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्र. 1च्या वतीने बोरिवली पूर्व नॅशनल पार्कसमोरील ओमकारेश्वर मंदिराजवळ तीव्र निदर्शने करून घोषणाबाजी, ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.

आठ दिवसांत पुतळा बसवणार प्रशासनाची सपशेल शरणागती

बेळगाव जिह्यातील मनगुत्ती येथे रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा येडेपणा करणाऱया कर्नाटकातील भाजप सरकारला अखेर जनक्षोभासमोर झुकावे लागले. कर्नाटक सरकारने येत्या आठ दिवसांत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरी तहसीलदार व गावातील पंचांची बैठक होऊन येत्या आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय झाला.

मनगुत्तीत कानडी पोलिसांचा महिलांवर लाठीमार

मनगुत्ती येथे मराठी भाषिक ग्रामस्थ आज पुन्हा रस्त्यावर उतरले होते. महिला वर्ग या वेळी चांगलाच संतप्त झाला होता. त्यामुळे कानडी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केल्याने वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले होते. सकाळी गावात पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. बैठक संपल्यानंतर पोलिसांनी ग्रामपंचायत व शाळेसमोर जमलेल्या ग्रामस्थांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा ग्रामस्थ आक्रमकच होते.

पश्चिम महाराष्ट्रात तीव्र संताप

कोल्हापुरातील शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर जाऊन कर्नाटक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. शिवाय, उद्या सीमाभागातील मनगुत्ती गावात घुसून धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गडहिंग्लज परिसरातील शिवसैनिकांनी रात्री भर पावसात मनगुत्ती गावात जाऊन ग्रामस्थांना पाठिंबा दिला. आजऱयातील शिवसैनिकांनी संभाजी चौकात कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या