अपघातात गुप्तांग गमावले, न्यायालयाच्या आदेशामुळे मिळाली 17 लाखांची नुकसानभरपाई

रस्ते अपघातात एका व्यक्तीला त्याचे गुप्तांग गमवावे लागले होते. गुप्तांग गमावल्याने त्याला इतरांप्रमाणे वैवाहीक आयुष्य जगता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन कर्नाटक उच्च न्यायालयाने या तरुणाला 17 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. बसवराजू असं या तरुणाचं नाव असून 11 वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला होता.

हावेरी जिल्ह्यातील रानीबेन्नूर शहरात बसवराजू याचा अपघात झाला होता. या अपघातात त्याला त्याचे गुप्तांग गमवावे लागले होते. या धक्क्यातून सावरल्यानंतर आणि पूर्णपणे बरा झाल्यानंतर बसवराजूने मोटार अपघात दावा प्राधिकरणापुढे नुकसानभरपाईसाठीची मागणी केली होती. प्राधिकरणाने त्याला फक्त 50 हजारांची नुकसानभरपाई देऊ केली होती. याव्यतिरिक्त प्राधिकरणाने विमा कंपनीला सगळे दावे मिळून 3.73 लाख रुपये देण्यासही प्राधिकरणाने सांगितलं होतं.

बसवराजू याने आपल्याला 11.75 लाखांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने बसवराजू याची एकूण परिस्थिती लक्षात घेता, त्याने मागितलेल्या रकमेपेक्षा जास्त नुकसानभरपाई त्याला मिळवून दिली. बसवराजूच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विमा कंपन्यांना बसवराजू याला 17.68 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

2011 साली बसवराजू रस्त्याने चालत जात होता, यावेळी त्याला एका ट्रकने मागून धडक दिली होती. या अपघातामुळे त्याचं गुप्तांग कायमस्वरुपी निकामी झालं होतं. त्याच्या या परिस्थितीमुळे तो लग्न करू शकत नाही आणि इतरांप्रमाणे विवाहीत आयुष्यही जगू शकत नाही असं नमूद करताना न्यायालयाने बसवराजू याच्या माणगीचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करत त्याला नुकसानभरपाई मिळवून दिली. बसवराजूने जे गमावलंय आणि त्याच्या आयुष्यावर अपघातानंतर जो परिणाम झाला आहे त्याची भरपाई पैशांत कधीच केली जाऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटलंय.