रात्रीस खेळ चाले; कर्नाटक सरकारचे भवितव्य ‘अंधारात’

17


सामना ऑनलाईन । बंगळुरू/दिल्ली

कर्नाटकातील राजकीय पेच रोज नवे वळण घेत आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर तत्काळ निर्णय घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सकाळी दिले परंतु विधानसभा अध्यक्षांनी मी माझ्या स्पीडने काम करणार असा पवित्रा घेतला. दरम्यान, विशेष विमानाने बंडखोर आमदार मुंबईहून बंगळुरात पोहचले. विधानसभा अध्यक्षांकडून मध्यरात्री उशिरापर्यंत राजीनामे तपासण्याचा खेळ सुरू होता. हा रात्रीचा खेळ पाहता कुमारस्वामी सरकारचे भवितव्य ‘अंधारात’ आहे असेच स्पष्ट होत आहे.

गेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या 11, जेडीएसच्या 3 आणि अपक्ष 2 अशा 14 आमदारांनी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडून राजीनामे स्वीकारले जात नाहीत असा आरोप करीत आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात काल धाव घेतली. यावर  काल सुनावणी झाली. 10 याचिकाकर्ते आमदार सायंकाळी सहा वाजता विधानसभा अध्यक्षांपुढे हजर होतील. त्यांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि उद्या (दि. 14) न्यायालयापुढे काय निर्णय घेतल्याची प्रत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आमदार मध्यरात्री मुंबईत परत

दोन विशेष विमानानी दहा बंडखोर आमदार सायंकाळी बंगळुरूला रवाना झाले. बंगळुरू विमानतळावरून कडेकोट सुरक्षेत विशेष बसमधून विधानभवनात पोहचले. विधानसभा अध्यक्षांकडे नव्याने राजीनामापत्रे दिली. मध्यरात्री उशिरा हे आमदार पुन्हा मुंबईत परतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विजेच्या वेगाने निर्णय कसा घेणार – विधानसभा अध्यक्ष

  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार ऍक्शनमध्ये आले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत ताबडतोब निर्णय घ्या. असा कसा निर्णय घेणार? विजेच्या वेगाने मी कसे काम करणार? मी माझ्याच स्पीडने काम करणार आहे.
  • आमदार आले व त्यांनी राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे खरे आहेत का, कोणाच्या दबावाखाली दिले आहेत हे तपासावे लागेल.
  • सर्व कामकाजाची व्हिडीओग्राफी केली जाणार असून मी ती सुप्रीम कोर्टाला देणार आहे.
  • काही आमदार मुंबईला निघून गेले. माझ्याकडे सुरक्षा मागितली असती तर दिली असती, पण आमदार भूकंप झाल्यासारखे वागत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या