कर्नाटक : येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार? चर्चांना उधाण

कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देखील देशातील विविध राज्यात राजकीय हालचाली सुरू आहेत. कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील राजकीय चढाओढ पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. हिंदी वृत्तसंकेतस्थळ ‘आजतक’ने यासंदर्भातील वृत्तप्रसिद्ध केले आहे. बी.एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊ शकतील अशी चर्चा आहे. भाजपने मात्र हे वृत्तफेटाळले आहे.

या प्रकरणी काल रात्री बंगळुरुमधील पाच मंत्र्यांची चर्चा झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री सुधाकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अन्य पाच मंत्र्यांनीही हजेरी लावली होती. ज्यात येडियुरप्पा यांना पदावरून पायउतार केल्यास निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे कळते.

या बैठकीत मंत्री सुधाकर यांच्याशिवाय बी.एस.पाटील, आनंदसिंग, सोमशेखर, नागेश (अपक्ष आमदार )हे उपस्थित होते. सिद्धरामय्या यांचे सरकार पडल्यानंतर हे सर्व आमदार बी.एस. येडियुरप्पा यांच्या विश्वासावरच भाजपबरोबर आले, त्यांना नंतर मंत्रीपद देण्यात आले.

आता, येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून निरोप घेतील तर त्यांच्या भविष्यावरही संकटाचे ढग गडद होऊ शकतात. अशा परिस्थितीत पुढल्या रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली.

कर्नाटकमधील बर्‍याच स्थानिक माध्यमांमधून बी.एस. येडियुरप्पा पद सोडण्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यावर भाजपकडून निवेदन देण्यात आले. भाजपचे प्रवक्ते गणेश कर्णिक यांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, भाजपकडून हे वृत्त फेटाळले जात आहे.

चर्चा आहे की, बीएस येडियुरप्पा यांना डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकले जाऊ शकेल. त्यांच्या वाढत्या वयामुळे, अनेक आमदार आणि मंत्र्यांच्या नाराजीबरोबरच भाजपदेखील नेतृत्व बदलून आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या