
कर्नाटकातील शंकेश्वर येथील शाळेची सहल घेऊन महाबळेश्वरला आलेल्या कर्नाटक आगाराच्या एसटी बसचे केळघर घाटातील कातळकडय़ालगत ब्रेक निकामी झाले. एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे खोल दरी अशी स्थिती असताना चालकाने प्रसंगावधान राखत गिअरच्या साहाय्याने वेग कमी करत बस डोंगराला धडकवून बस थांबविली. त्यामुळे या बसमध्ये असलेल्या 50 विद्यार्थ्यांचे जीव वाचले आहेत.
कर्नाटकातील शंकेश्वर येथील शाळेतील विद्यार्थ्यांची सहल महाबळेश्वरला आली होती. हे सर्व विद्यार्थी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत होते. महाबळेश्वर फिरून झाल्यानंतर बस सातारामार्गे पुन्हा कर्नाटकला निघाली होती. महाबळेश्वरच्या केळघर घाटात दोन ते तीन अवघड वळणे पार केल्यानंतर कातळकडा परिसरातील वळणावर चालकाने बसला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक लागलाच नाही. त्यामुळे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. पुढे अवघड वळण, तीव्र उतार, एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला डोंगर अशा स्थितीत सगळा थरार सुरू होता. मात्र, चालकाने गिअर कमी करत बसचा वेग नियंत्रणात आणला. त्यानंतर बस सगळ्यात अवघड असणाऱया काळ्या कडय़ाच्या डोंगराला धडकावून थांबविली.
बस थांबवत असताना समोरून महाबळेश्वर डेपोची एसटी बस येत होती. कर्नाटक आगाराची एसटी बस विरुद्ध दिशेने आपल्याकडे येत असल्याचे दिसताच, त्या बसच्या चालकासह इतर वाहनचालकांनी आपापली वाहने जागेवरच थांबविली. त्यानंतर विद्यार्थ्यांची बस डोंगराला धडकवून थांबविण्यात चालकाला यश आले. बस थांबताच बसमधील 50 विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव भांडय़ात पडला.