हिंदुस्थानातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडॉर उघडणार

500

हिंदुस्थानातील शीख भाविकांसाठी करतारपूर कॉरिडॉर 9 नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. लाहोरपासून सुमारे 125 किलोमीटरवर नरोवारमध्ये करतारपूर कॉरिडॉरबाबतची घोषणा स्थानिक आणि परेदशी पत्रकारांसमोर केली. कॉरिडॉरचे काम 86 टक्के पूर्ण झाले आहे. 9 नोव्हेंबरला कॉरिडॉर उघडण्यात येणार असल्याचे योजनेचे संचालक आतिफ माजिद यांनी सांगितले.

करतारपूर कॉरिडॉरला येणाऱ्या भाविकांकडून सुविधा शुल्क घेण्यात येईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉक्टर मोहम्मद फैसल यांनी सांगितले होते. ते शुल्क सुमारे 20 अमेरिकी डॉलरएवढे असेल, असेही त्यांनी म्हटले होते. या कॉरिडॉरबाबतच्या तिसऱ्या टप्प्यातील बैठकीत पाकिस्तानने हिंदुस्थानसमोर हा मुद्दा मांडला होता. हे शुल्क फक्त देण्यात येणाऱ्या सुविधांचे असून आम्ही कोणतेही प्रवेश शुल्क आकारत नसल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी, औषधोपचार आणि इतर सुविधांसाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे. भाविकांना देण्यात येणारा प्रसाद आणि लंगरबाबतही दोन्ही देशांत सहमती झाली आहे. तसेच भाविकांचा हा प्रवास सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण वातावरणात व्हावा, यावरही दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

तिसऱ्य़ा टप्प्यातील बैठकीत कॉरिडॉरच्या अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी हिंदुस्थान जबाबदार असल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. तसेच अटारी-वाघा सीमाभागात झालेल्या चर्चेदरम्यान काही मुद्द्यांवर सहमती झाली नसल्याने करार झाला नसल्याचे हिंदुस्थानने स्पष्ट केले होते. तर काही मुद्दे वगळता दोन्ही देशांची सहमती झाल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. आता 9 नोव्हेंबरला शीख भाविकांसाठी कॉरिडॉर उघडणार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या