अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘धमाका’, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कमावले 85 कोटी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर देशभरातील चित्रपटगृहांना टाळे लागले होते. परंतु गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत असले तरी चित्रपटगृह अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. याचा फायदा ओटीटी प्लॅटफॉर्मला होत असून अनेक बिग बजेट चित्रपट येथे प्रदर्शित होत आहेत.

चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहते गर्दी करत आहेत. कोट्यवधी लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबसिरीजचा आनंद घेत असल्याने याचे महत्त्वही वाढले आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपयेही मोजत आहेत. आता सूत्रांकडून अशी बातमी आली आहे की कार्तिक आर्यन याच्या आगामी चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने तब्बल 85 कोटी रुपये मोजले आहेत.

कार्तिक आर्यन याच्या ‘धमाका’ या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने 85 कोटी रुपये मोजले आहेत, असे वृत्त ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 2021 मधील हा बिग बजेट चित्रपट असून जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘धमाका’ या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मोठा पडदा शेअर करणार आहे. याआधी 22 नोव्हेंबर, 2020 ला आपल्या वाढदिवशी कार्तिक आर्यन याने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. तेव्हापासून त्याचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले आहेत.

10 दिवसात चित्रिकरण पूर्ण

दरम्यान, राम माधवानी यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण अवघ्या 10 दिवसांमध्ये पूर्ण झाले होते. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन अर्जून पाठक या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासह कार्तिक जान्हवी कपूरसह ‘दोस्ताना-2’ आणि ‘भूलभूलैया-2’ मध्येही दिसणार आहे. यात त्याच्यासोबत कियारा आडवाणीही असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या