कोरठणला कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी

744

नगरमधील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा येथे कार्तिक पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होत पौर्णिमेची पर्वणी साधून  श्री खंडोबाचे दर्शन घेतले.

 पहाटे 6 वाजता श्री खंडोबास मंगलस्नान पूजा झाल्यानंतर सकाळी 7 वाजता श्री खंडोबाची अभिषेक महापूजा प्रतिभा व संतोष ठुबे (मुंबई),धोंडिभाऊ  पठाडे परिवार,साळवाडी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड ,रामदास मुळे,किसन मुंढे,किसन धुमाळ,बन्शी ढोमे,शांताराम खोसे,बबन झावरे,गोपीनाथ घुले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर 8 वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळी 9.30 वाजता श्री खंडोबाच्या उत्सव मुर्तीची पालखी मिरवणूक वाजत गाजत मंदिरातून निघाली. या पालखीवर भक्त भंडारा खोबरे यांची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत होते. काही पालखीपुढे भाविक ओलांडा घेत होते. पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा करून लंगर तोडल्यानंतर पालखी मंदिरात परत आली. सकाळी 11 वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या