इंद्राणी मुखर्जी माफीची साक्षीदार झाली; पी. चिदंबरम, कार्तीची झोप उडाली

75

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शीना बोरा हत्येप्रकरणी गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात असलेली मीडिया बॅरॉन पीटर मुखर्जीची बायको इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी दाखल खटल्यात माफीची साक्षीदार झाली. विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी इंद्राणी हिला माफीची साक्षीदार घोषित करताच या खटल्यातील प्रमुख आरोपी असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांची झोप उडाली आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणातील एक आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिने या प्रकरणात माफीची साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला होता. तिच्या अर्जाची दखल घेऊन न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात तिला माफी दिली होती तर काल तिला माफीचा साक्षीदार करून घेतले. इंद्राणीला आता माफी मिळाली आहे, परंतु न्यायालयात जर या खटल्याविषयी चुकीची माहिती दिली तर तिची माफी रद्द करण्यात येऊन तिच्याविरुद्धही खटला चालविण्यात येईल असा इशारा न्यायाधीशांनी दिला आहे.

मी जे सांगेन ते सत्य सांगेन

माझी विनंती मान्य करून न्यायालयाने मला काही अटींवर माफी दिली आहे. मला न्यायालयाच्या सर्वच अटी मान्य आहेत. त्यामुळे या खटल्याबद्दल मला ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत त्या सर्व गोष्टी मी न्यायालयात सांगून फिर्यादी पक्षाला सहकार्य करीन. ‘मी जे काही सांगेन ते सर्व सत्य असेल’, असेही इंद्राणीने न्यायालयास सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या