कसारा-नाशिक बससेवा बंद

15

सामना प्रतिनिधी । कसारा

पंधरा वर्षांपासून सुरू असलेली एसटीची कसारा-नाशिक ही बसफेरी अचानक बंद करण्यात आल्याने यामार्गावरील प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. पुरेसे भारमान मिळत नसल्याचे कारण देत शहापूर आगारप्रमुखांनी तडकाफडकी बस पेâNयाच बंद केल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कसारा-नाशिक आणि नाशिक-कसारा या मार्गावर दररोज २६ फे-या अविरतपणे धावतात. दररोज अंदाजे दीड हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. एक बस सरासरी १७ हजारांचे उत्पन्न देते. या मार्गावर एसटीने नियमित प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत. नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, कल्याण, ठाणे येथे जाणा-या प्रवाशांना कसारा-नाशिक ही बस सेवा मोठा आधार आहे. मुंबई, ठाण्यात नोकरी करणारे चाकरमानी लोकलने कसारापर्यंत येतात. तेथून कसारा-नाशिक बसने नाशिक, शिर्डी, वणी, अकोला, लासलगाव, चाळीसगाव, धुळे मार्गावर प्रवास करतात. मात्र गेल्या १५ दिवसांपासून अचानक ही बसफेरीच बंद केल्याने प्रवासी वर्गाचे आतोनात हाल होत आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर

प्रवाशांनी आगारप्रमुख श्रीमती शेळके यांची भेट घेऊन ही बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. यावर त्यांनी जिथे एसटी उभी केली जाते तिथेच अवैध्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात मग आम्ही बसफेरी का सुरू करावी असा सवाल केला. तुम्ही अवैध्य प्रवासी वाहतूक रोखा मगच कसारा -नाशिक बसफेरी सुरू करू असे त्यांनी विधान केले. मुळात ८० टक्के प्रवासी हा एसटीनेच प्रवास करतो. केवळ अवैध्य प्रवासी वाहतुकीचे कारण देऊन फायद्यात असलेली बसफेरी बंद करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची तिखट प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत.

एसटीच्या मुळावर अवैध्य प्रवासी वाहतूक

कसारा-नाशिक बसफेरी बंद पडण्यास अवैध्य प्रवासी वाहतूक हेही एक प्रमुख कारण आहे. कसारा रेल्वे स्थानकाबाहेर अवैध्य प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांचा अक्षरश: गराडा असतो. जवळपास ३०० ते ३५० वाहने येथे उभी असतात. स्थानकातून प्रवासी बाहेर पडताच हे वडापचालक प्रवाशांना एसटीकडे जाऊच देत नाहीत. त्यांना कमी तिकीट दराचे आमिष दाखवून आपल्याकडे खेचतात. यामुळेही एसटीचे भारमान कमी झाले आहे. अर्थपूर्ण संबंधामुळे पोलीसही या वाहनांवर काहीच कारवाई करत नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या