kasba bypoll result : दुखावलेल्या शिवसैनिकांच्या रागाचा परिणाम, भाजपने गमावली कसब्याची जागा

पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या होत्या. त्यातही कसबा मतदारसंघात काय होणार याची चर्चा अधिक होती. अखेर कसब्यात भाजपचा 28 वर्षांनी पराभव झाला आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला. या विजयामागे अनेक कारणांची चर्चा होते. मात्र त्यातील एक मुख्य कारण मानलं जात आहे ती मूळ शिवसेनेशी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी केलेली गद्दारी.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देताना ’40 वर्षांपासून कसब्यात भाजप जिंकत होती पण हा विजय त्यांना शिवसेनेच्या मदतीने मिळत होता, असं ठणकावून सांगितलं. कसबा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या. वृत्तवाहिन्यांवरून अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. यात काही शिवसैनिकांनी देखील आपलं मत व्यक्त केलं.

शिवसेनेत पाडण्यात आलेली फूट, भाजपच्या मदतीने झालेलं सत्तांतर, निवडणूक आयोगाचा निकाल अशा एकामागून एक घडामोडी सुरू होत्या. या घडामोडींमुळे युतीत भाजपसाठी जीवाचं रान करणारे शिवसैनिक चांगलेच नाराज होते. त्यांना आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी संधी हवी होती. ते संधीच शोधत होते. पुण्यातील पोटनिवडणुकीमुळं ही संधी चालून आली. ती संधी साधत दुखावलेल्या शिवसैनिकांनी भाजपला आपली जागा दाखवून दिल्याचं बोललं जात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेली शिवसेना तोडून फोडून शिंदेंच्या हाती दिल्यानं शिवसैनिक कमालीचे नाराज आहेत. तिच नाराजी आता भाजपला निवडणुकांच्या निकालातून दिसल्याचं बोललं जात आहे. 28 वर्षानंतर त्यांचा बालेकिल्ला हातातून निसटण्यामागे हे महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे.

काही शिवसैनिकांनी वृत्तवाहिन्यांवरून आपली यासगळ्या निकालावरची मतं जाहीरपणे बोलून दाखवली. ‘उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं वर्षा ते मातोश्री असा प्रवास या भाजपनं करायला लावला, त्याचा राग आमच्या मनात होता. आम्ही सुट्ट्याकाढून काम केलं. आमच्या घराघरांत पैसे वाटण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही झुकलो नाही. पण पैसा हरला, माणुसकी जिंकली. धंगेकरांना मिळालेल्या मतांमध्ये जवळपास 10 ते 15 हजार मतं शिवसैनिकांची आहेत. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या पैशांना भीक घातली नाही’, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

‘धंगेकरांना निवडून आणायचं हा आदेश आला होता. आदेश आला की खरा शिवसैनिक मागेपुढे बघत नाही. शिवसैनिक तुटून पडले. आदित्य ठाकरे यांच्या सभेला जी उत्स्फूर्त गर्दी झाली, त्यावरून बरंच काही स्पष्ट झालं होतं, अशी प्रतिक्रिया एका शिवसैनिकानं ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.