दहशतवादी कश्मीरमध्ये कारबॉम्ब स्फोट करण्याच्या तयारीत

30
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मूकश्मीरमधील सुंजवान लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर तसाच हल्ला श्रीनगरमधील करण नगर सीआरपीएफच्या तळावर करण्याचा दहशतवाद्यांचा कट जवानांनी उधळून लावला. यामुळे चवताळलेल्या जैश ए मोहम्मद व लश्कर ए तोयबा या दोन दहशतवादी संघटनांनी कश्मीरमध्ये कारबॉंम्बस्फोट घडवून आणण्याची योजना आखल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जैश ए मोहम्मद व लश्कर ए तोयबाचे मोबाईल कॉल्स इंटरसेप्ट करताना ही माहिती समोर आली आहे.

सुंजवान लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरू केली आहे. कश्मीर खोऱ्यातील गावे जवान अक्षरश: पिंजून काढत आहेत. सोमवारी सकाळीही जवानांनी करण नगर  भागातील सीआरपीएफच्या तळावर हल्ला हल्ला करण्याचा तयारीत असलेल्या दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. एका इंग्रजी वृत्तवाहीनीने दिलेल्या माहितीनुसार जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा १५ जानेवारीलाच देण्यात आला होता. त्यानंतरही कश्मीरमध्ये दोन हल्ले व जम्मूमध्ये एक हल्ला झाला. या हल्ल्यांमध्ये ६ जवान शहीद झाले असून १० दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला आहे.

दरम्यान गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाचे दहशतवादी स्फोटकांनी भरलेली कार किंवा ट्रक घेऊन हल्ला करणार असल्याचे समजते.लष्कराच्या एका अधिकाऱ्यानेही या वृत्तास दुजोरा दिला असून दहशतवादी सरकारी अधिकाऱ्याचे निवासस्थान, विधानसभा, लष्कराचा तळ, हॉटेल अशा ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
२००१ साली देखील जम्मू कश्मीर विधानसभेवर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. टाटा सुमो गाडीत स्फोटके भरुन ती उडवण्यात आली होती. यात चाळीस हून अधिक नागरिक व तीन दहशतवादी ठार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या