आई मला किरण बेदींच्या बातम्यांची कात्रणे दाखवायची! कश्मिराने उलगडले यशाचे गुपित

लहान असताना माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या बातम्यांची कात्रणं आई मला दाखवायची. या बातम्या वाचून मलाही सरकारी सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करावी असं सतत वाटायचं. किरण बेदींपासून प्रेरणा घेऊन मीदेखील नागरी सेवा परीक्षांची तयारी करावी असा विचार लहानपणापासून सुरू केला. आता हे स्वप्न खऱया अर्थाने साकारणार आहे. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात मी पहिल्या क्रमांकावर आली. आता किरण बेदींचाच आदर्श डोळय़ांसमोर ठेवून पुढे काम करण्याचा निर्धार केला असल्याचे कश्मिरा संखे हिने सांगितले.

कश्मिरा संखे ही यूपीएससीच्या परीक्षेत देशात 25 व्या रँकवर आल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबात आनंदाला पारावार उरला नाही. निकाल लागल्यापासूनच तिच्यासह कुटुंबातील सर्वांचे फोन खणखणू लागले. नातेवाईकांपासून सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. आपल्या यशाचे गुपित उलगडताना ती म्हणाली की, पदवीपर्यंतचे शिक्षण मी मुंबईत घेतले. डेंटल सर्जरीमध्ये पदवी संपादन केली. डेंटिस्ट म्हणून काम करत असताना हा विषय सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याची जाणीव झाली.

 पालघरची कन्या ठाण्याची रहिवासी

यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेली कश्मिरा संखे ही पालघरची कन्या ठाण्याची रहिवासी आहे. सध्या ती श्रीनगर परिसरात राहात असून यूपीएससीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याचे समजताच श्रीनगरमधील संखे यांच्या आप्तेष्टांनी तसेच मित्रमंडळींनीही घरी जाऊन कश्मिरा तिच्या कुटुंबाचे कौतुक केले.

आयएएसला प्राधान्य

यूपीएससीची परीक्षा पास झाल्याने आता नागरी सेवेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर आरोग्य क्षेत्रात आता काम करण्याची संधी मिळणार आहे. लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नावर मी ठाम असून पहिलं प्राधान्य आयएएस बनण्याला आहे, तर दुसरं प्राधान्य आयएफएसला देणार आहे. पण मला महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली तर निश्चित आवडेल. कारण या मातीशी संस्कृतीशी माझी नाळ जुळली असल्याचेही कश्मिरा हिने सांगितले.