मतदार यादीत नाव नसल्याने कश्मिरी पंडितांचे आंदोलन

सामना ऑनलाईन । जम्मू

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी येथील श्रीनगर मतदार क्षेत्रातील विशेष केंद्रांमध्ये कश्मिरी पंडीत मतदानासाठी गेले खरे; पण मतदार यादीत त्यांचे नावच नसल्यामुळे ते मतदान करू शकले नाहीत. यामुळे संतापलेल्या कश्मिरी पंडितांनी अनेक मतदान केंद्रांवर प्रशासन आणि निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार आंदोलन केले.

मतदान करू न शकलेल्या राधाकृष्ण भट यांनी सांगितले की, आम्ही मतदानासाठी केंद्रांवर गेलो, पण यादीमधून आमचे नावच गायब होते. यामुळे आम्हाला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. माझ्या कुटुंबीयांपैकी चार जण मत टाकू शकले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. असाच प्रकार मिंटू मावा यांच्या कुटुंबीयांबाबतही घडला. तेही स्थलांतरित कश्मिरी पंडीत असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून ‘फॉर्म-एम’ भरून घेतला होता. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाव मतदार यादीत असायला हवे होते. आमचा मतदानाचा हक्क का डावलला गेला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणखी एक स्थलांतरित कश्मिरी पंडीत स्वरूप चांद हेदेखील मतदानासाठी आपल्या पाच जणांच्या कुटुंबीयांसहीत गुरुवारी गेले होते, पण त्यांचेही नाव मतदार यादीत नव्हते.

एआरओंच्या उलटय़ा बोंबा

मतदारांची यादी बनवताना काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्यामुळे काही कश्मिरी पंडितांची नावे गहाळ झाली असावीत, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर (एआरओ) पंकज आनंद यांनी पंडितांच्या आंदोलनानंतर केला. ते म्हणाले की, कश्मिरी पंडितांना मतदान करायला मिळाले नाही अशा अगदी थेडय़ा घटना घडल्या. बाकीच्यांच्या बाबतीत फॉर्म-एम चुकीचा भरल्यामुळेही असे झाले असावे, अशा उलटय़ा बोंबाही एआरओंनी ठोकल्या.