चहाप्रेमींसाठी हेल्दी पर्याय.. काश्मिरी चहा प्या..

चहा हे हिंदुस्थानचं राष्ट्रीय पेय म्हणून ओळखलं जातं. बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. असे अनेक चहाप्रेमी आहेत जे दिवसातून २-३ वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहाचं सेवन करतात. चहा प्यायल्याने रिफ्रेश वाटत असलं तरी जास्त चहाचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत. यासाठीच अलिकडे अनेकजण ग्रीन टी, हर्बल टी अशा चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे वळू लागले आहेत. अशातच चहासाठी आणखी एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे काश्मिरी कहवा.

कावा किंवा कहवा चहा हा काश्मिरमधील पारंपरिक चहा असून तो अत्यंत सुंगंधित आणि स्वादिष्ट असतो. मुळात हा चहा कॅफेन फ्री असल्याने त्याचे आरोग्यासाठी कोणतही नुकसान नसून अनेक फायदे आहेत. काश्मिरी कहवा चहा हा विविध गरम मसाल्यांपासून तयार केला जातो. यामध्ये दालचिनी, वेलची, केसरसह विविध गरम मसाल्यांचा वापर केला जातो. कहवामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. तसचं यातील गरम मसाल्यांमधील गुणधर्मांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

जर तुम्हाला चहाचं व्यसन मोडायचं असले तर चहाच्या जागी पर्यायी चहा म्हणून तुम्ही कहवाचा पर्याय नक्कीच निवडू शकता. यासाठी कहवाची खास रेसिपी. तसेच या चहाचे फायदे –

साहित्य-
४ कप पाणी, ४-५ वेलची, १ इंच दालचिनीचा तुकडा, केशराच्या ५-६ काड्या, एक चमचा वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, ३-४ लवंग, ३-४ काळिमिरी, गुळवेलचे १-२ तुकडे, सुंठ, ग्रीन टीची पानं. साखर किंवा मध, बारीक किसलेले बदामाचे काप.

कृती-
२ कप कहवा तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये ४ कप पाणी उकळायला ठेवावे. त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये वेलची आणि दालचिनी हलकी कुटून ती पाण्यात टाकावी, त्यानंतर त्यात केसर, गुलाबाच्या पाकळ्या, ३-४ लवंग, काळिमिरी तसचं गुळवेल टाकावी. त्यानंतर या चहात सुंठाचे १-२ तुकडे टाकावे. तसचं गुळवेलचे तुकडे आणि १ चमचा ग्रीन टी ची पानं टाकावी.
सर्व साहित्य पाण्यात टाकल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून पातेल्यावर झाकण ठेवावं. आता १० मिनिटं चहा उकळू द्यावा. त्यानंतर यात २ चमचे साखर टाकावी. साखरेचा वापर टाळायचा असल्यास तुम्ही वरून १ चमचा मध घेऊ शकता. साखर टाकून एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. कपमध्ये चहा ओतावा.
चहा सर्व्ह करण्यासाठी कपमध्ये बारीक किसलेला बदाम किंवा बदामाचे बारीक काप टाकावे.

कहवा पिण्याचे फायदे –
रोगप्रतिकार क्षमता वाढते- या चहातील विविध मसाल्यांमधील अँटीऑक्सिडंट्स तसेच बदामातील पोषक तत्वांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे कोणत्याही व्हायरल आजारांपासून संरक्षण होण्यासही केहवा फायदेशीर ठरतो.

वजन कमी होण्यासाठी- वजन कमी करण्यासाठी चहाला एक योग्य पर्याय म्हणून कावा फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसचं चयापचय क्रिया जलद झाल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते- कहवाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास म्हणजेच शरीर डिटॉक्स करण्यासाठी कहवाचं सेवन उपयुक्त ठरतं. तसचं पोटातील बॅक्टेरियल इंफेक्शन बरं करण्यासाठी हा चहा गुणकारी आहे.

निरोगी त्वचेसाठी- कहवामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने याचा त्वचेला देखील फायदा होतो. या चहाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. तसचं त्वचा कोरडी होत नाही.

ताण कमी होतो- कहवा चहाचा मोहक सुगंध आणि चव यामुळे मूड ताजा होण्यास मदत होते. यामुळे मेंदूला आवश्यक पोषक तत्व मिळतात. ताण कमी होण्यास मदत होते. तसचं नेहमीच्या चहाप्रमाणेच कावाच्या सेवनामुळे देखील रिफ्रेश होण्यास मदत होते.
त्यामुळे कॅफेन फ्री अशा कावाचा तुम्ही पर्यायी चहा म्हणून दिनचर्येत समावेश करू शकता. मात्र या चहामध्ये गरम मसाले असल्याने दिवसातून एकदाच या चहाचं सेवन करावं