कौरव-पांडवांचे नवे महाभारत इथेही समेट कोणाला हवाय?

446

<<  रोखठोक >>   << संजय  राऊत >>

मुंबईच्या लढाईस कौरव-पांडवांचे युद्ध असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ‘युती’ तुटली. त्याचे खापर फोडण्यासाठी ‘शकुनी’ शोधण्यापेक्षा महाभारतातही समेट का झाला नाही व शेवटी युद्ध का झाले? याचा अभ्यास श्रीकृष्णाच्या भूमिकेतून करायला हवा. श्री उद्धव हे मोलाचे व्यक्तिमत्त्व महाभारत व भागवतात होतेच. तो श्रीकृष्णाचा अर्जुनाप्रमाणे प्राणसखाच होता.

मुंबईची निवडणूक हे महाभारत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यालाही महाभारतच म्हटले गेले. आज जे लोक महाराष्ट्राच्या सत्तास्थानी बसले आहेत, त्यापैकी एकही जण त्या महाभारतात सहभागी नव्हता. मुंबई महाराष्ट्रास मिळावी यासाठी खऱ्या अर्थाने जे महाभारत घडले त्याचे ‘स्मारक’ मुंबईतील फोर्ट परिसरात आहे. त्या सर्व भागास हुतात्मा चौक म्हणतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी (उमेदवारांनी) हुतात्मा स्मारकावर जाऊन शपथा वगैरे घेतल्या. यामुळे हुतात्म्यांचे पवित्र आत्मेही तडफडले असतील. मुंबई महाराष्ट्रात राहिली काय किंवा स्वतंत्र केली काय, मुंबईवर भूमिपुत्रांचा ठसा राहिला काय किंवा पुसला काय, याचे विद्यमान राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. नागपुरात बसलेले काही नेते महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करतात तेव्हा इथे मुंबईत तोंडास बूच मारून बसलेले लोक हुतात्मा स्मारकावर जातात, ते कोणत्या हेतूने? महाभारताचा लढा न्याय आणि सत्यासाठी झाला. तसा मुंबईचा लढा हा महाराष्ट्राची इज्जत आणि प्रतिष्ठेसाठी झाला. मुंबईचे वस्त्रहरण द्रौपदीप्रमाणे करण्यात आले. ते रोखण्याचा हा लढा होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, हे कौरव-पांडवांचे युद्ध आहे, पण संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या वेळी धृतराष्ट्र दिल्लीतच होते. आजही धृतराष्ट्र मंडळ दिल्लीतूनच सूत्रे हलवत आहे. पण मराठी जनता गांधारी नाही!

संकटे येऊ द्या!

संकटे आणि संघर्ष महाराष्ट्राच्या पाचविलाच पुजलेला आहे. त्या संघर्षातूनच महाराष्ट्र उभा राहतो. शिवसेना हे संघर्षाचे दुसरे नाव. फ्रान्समधील प्रख्यात लेखक अनातोले याने एके ठिकाणी लिहिले आहे, ‘‘ ‘दैवाने तुझे काय करू’ असे जर मला विचारले, तर मी त्याला म्हणेन, ‘माझे सारे काही दूर कर, परंतु माझी धडपड दूर करू नकोस. माझा संघर्ष, माझी वेदना दूर करू नकोस!’ ’’

महाभारतात कुंती म्हणाली, ‘सदैव मला विपत्तीच दे.’ विपत्ती म्हणजेही धडपडच. संघर्ष आणि ओढाताण. शिवसेनेला कौरवांची उपमा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ‘महाभारत’ पुन्हा नजरेखालून घालायला हवे. महाभारत हे सत्ता व सिंहासन यासाठी लढले गेले हे मला पटत नाही. हे युद्ध द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, तिचे पवित्र केस दुःशासनाच्या रक्तात भिजविण्यासाठीच लढले. द्रौपदीच्या अपमानाच्या सूडातून युद्धाची ठिणगी पेटली.

जबाबदार कोण?

युती तुटली त्यास ‘शकुनी मामा’ जबाबदार, असे मुख्यमंत्री म्हणतात. महाभारत घडण्याशी शकुनीचा काडीमात्रेने संबंध नाही. जे शिवसेना-भाजपच्या बाबतीत घडले तेच त्या काळी महाभारतात घडले. राजकारणात जसे घोळ घातले जातात  तसे तेव्हाही घातले गेले. वाटाघाटी, मध्यस्थ, निषेध, पुन्हा दूत, पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ हे महाभारतातही होते. शेवटी वाटाघाटीची सूत्रे कृष्णालाच हाती घ्यावी लागली. कुशल ‘सर्जन’ ज्याप्रमाणे सडलेला अवयव कापून टाकीत असतो त्याप्रमाणे कोणताही प्रश्न कुजविण्याऐवजी तडीस लावणे अशी कृष्णाच्या राजकारणाची दिशा होती, असे ‘महाभारत’ अभ्यासकांचे म्हणणे आहे. समेट होऊच नये व पाप नष्ट व्हावे यासाठी एकदाचे युद्ध व्हावे यासाठीच जणू शिष्टाईसाठी धावपळ करणारा श्रीकृष्ण अंतरंगातून प्रयत्न करीत होता. आजच्या राजकारणातही ‘युती’ व ‘समेट’ घडविण्यासाठी भले प्रयत्न वरवर दिसत होते, पण जे सर्वात जास्त युतीचे समर्थक होते असे श्री. उद्धव ठाकरे हेच शेवटी श्रीकृष्णाच्या भूमिकेत वावरले.

युद्धधर्मच खरा!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘समेट’ बिघडविणारे ‘शकुनी’च होते.’’ त्यांना महाभारताचा आत्मा माहीत नाही. पांडवांनी फक्त सहा गावे मागितली म्हणून त्यांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला, पण येथे कोणताही हक्क नसताना मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने ११४ गावे मागितली. (वॉर्ड हो!) व ज्यांना मुख्यमंत्री कौरवांची उपमा देतात त्या शिवसेनेने ६० गावे देण्याची तयारी दाखवून दिलदारीचे दर्शन घडवले हे सत्य का नाकारले जात आहे? महाभारतात युद्ध होणारच होते तशी युती तुटणारच होती. कारण कौरवांचा अरेरावीपणा ज्याप्रकारे भाजप सत्ताधाऱ्यांत उतरला होता तो दुर्योधनासही लाजवणारा होता. त्यामुळे भाजपने हे धर्मयुद्ध असल्याचे बोलणे योग्य नाही. ‘जशास तसे’ हा धर्माचा एक मोठा भाग आहे. दुष्टांना दंड करणे, कुरापतखोर अतिरेक्यांचा ठरवून वध करणे अशा धर्माच्या आज्ञा आहेत. त्यामुळे शिखंडीआडून बाण मारणे, द्रोणाशी खोटे बोलणे, कर्णाला अडचणीत पकडणे, दुर्योधनाची मांडी फोडणे या साऱ्या गोष्टी युद्धधर्मात बसतात. एकदा युद्धाला तोंड लागले म्हणजे जो धर्म पाळायचा तो मानवधर्म नसून फक्त युद्धधर्म होय! धर्मयुद्ध आणि युद्धधर्म यात जमीन-अस्मानाचा फरक आहे! जिथे कृष्ण आहे तिथे युद्धधर्म आहे!!

कृष्ण व उद्धव

मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी स्वतःला ‘पांडव’ म्हणवून घेतात, पण शेवटी पांडवांतही गुण-दोष होतेच व धर्मराजाने जुगारात आपल्या पत्नीस लावले व ते हरले. ‘पांडवां’ना ‘राज्य’ करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार नैतिक अधिष्ठानातून निर्माण झालेल्या प्रश्नांतून होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाभारतातील कोण हे ठरवण्यापेक्षा स्वयंभू पांडवांनी स्वतः नक्की कोणत्या पात्रांचे प्रतिनिधित्व करतोय हे पाहायला हवे.

महाभारत सांगितले जाते, श्री. उद्धव हे भगवान श्रीकृष्णाचे भाऊ व देवांचा खास दूत. श्रीकृष्ण व उद्धवातील चर्चेवर ‘उद्धवगीता’ अस्तित्वात आहे व ती मार्गदर्शक आहे हे नव्या कौरव-पांडवांनी समजून घेतले पाहिजे. उद्धव पूर्णपणे भगवान कृष्णाच्याच बाजूने उभे होते. म्हणजे धर्माच्या बाजूने उभे होते. आता महाभारतात ‘समेट’ का झाला नाही ते पहा! समेट होणे शक्य नाही हा कृष्णाचा निश्चय होता. कृष्ण हा समेट करण्यासाठी गेलाच नव्हता तर तो युद्ध अटळ करण्यासाठी, त्याचा समय निश्चित करण्यासाठीच गेला होता. दुसरा कोणीही दूत गेला तर त्याच्या हातून हे होणार नाही त्याची त्यास जाणीव असल्याने त्याने ही महान जबाबदारी आपल्यावर घेतली. परंतु हे जाणण्याची कुवत युधिष्ठरास नसल्याने तो त्याला मोघमपणे म्हणाला, ‘समेट होवो किंवा न होवो, पण प्रयत्न केला नाही असे लोकांनी म्हणू नये म्हणून मी जातो.’

पुढे हस्तिनापुरात गेल्यावर कृष्ण दुर्योधनास पदोपदी ठोकरी देतो त्यावरून ही गोष्ट स्पष्टच होते. दुर्योधनाच्या स्वभावाचे यथार्थ ज्ञान कृष्णास होते. तो चुकूनही समेटास अनुकूल होऊ नये आणि आपण वरकरणी जे बोलणार आहोत ते त्याने सुतराम मान्य करू नये असेच धोरण त्याने ठेविलेले होते.

तो आला तेव्हा त्याच्या उतरण्याची सोय दुःशासनाच्या महालात करण्यात आली होती. शक्य तर कृष्ण वळून आपल्या पक्षात यावा यासाठी आवश्यक ते सारे राजकारण तयार होते. नाना सौंदर्यलक्षणे मिरवणाऱ्या स्त्रिया, सुवर्ण, रत्ने यांची दाने त्याला लाच म्हणून तेथे सज्ज होती. पण कृष्णाने या सर्वांस उघडपणे लाथाडले आणि तो विदुराच्या घरी मुक्कामास गेला. अजून समेटाची बोलणी सुरू व्हायची होती. अशा वेळी का ही ठोकर समेटानुकूल वातावरण तयार करण्यासाठी दिलेली होती?

दुर्योधन यावेळी त्याला स्पष्टपणे म्हणाला, ‘‘कृष्णा, तू मध्यस्थ. दोघांना समान म्हणून आलेला माणूस. तुला हे वर्तन शोभत नाही!’’ त्यावर कृष्ण मोठे मासलेवाईक उत्तर देतो, ‘‘दुर्योधना, अशा गोष्टींचा विचार दोनच प्रसंगी संभवतो. एक, देणाऱ्याच्या मनात प्रेम असेल तर आणि दुसरा घेणारा गरजू असेल तर. तुझ्या मनात प्रेम नाही आणि मी गरजू नाही.’’

हे का समेटाचे बोलणे? जे असे मानतील त्यांनी आपणास शांतिदूत खुशाल म्हणावे, पण भागवत म्हणवू नये हे बरे. पुढे त्याने समेटाचे बोलणे केले त्यातही मधे मधे दुर्योधनावर मेहेरबानी केली जात आहे असा सूर ठेवला.

‘‘युद्धाचे हे भयंकर संकट तुमच्यावर आले आहे. तुझी इच्छा असेल तर यातून तुझी सुटका होऊ शकेल. तुझी वृत्ती दुराग्रहाची आहे. विपरीत आहे. या कर्माने तुझा समूळ नाश होणार आहे. अरे, अर्जुनाशी लढण्याची तुला ताकद तरी आहे काय?’’ अशा सुराने रुचिर बनविलेल्या बोलण्याने दुर्योधन वाकेल असे मानण्याएवढा कृष्ण काही दूधखुळा नव्हता. पण ज्यामुळे समेट दुरापास्त व्हावा, पण त्याचे खापर मात्र दुर्योधनाच्या कपाळावर फुटावे असे कौशल्याचे धोरण कृष्णाने ठेविले होते.

कृष्णाच्या मनाचा निर्धार पक्काच होता. वाटाघाटीच्या अखेरच्या फेरीसाठी निघताना कृष्ण भीमास म्हणाला, ‘‘न हि युद्धं न कामये।’’ म्हणजे मला युद्ध नको असे तुला वाटत असेल तर तसे नाही. इथे कोणा लेकाला समेट हवा आहे? मला युद्धच पाहिजे!

कृष्णाची ही सरळ भूमिका होती व देवाचा माणूस म्हणून सोबत असलेल्या श्री उद्धवाशी त्याने चर्चा केली. त्याला युद्धच हवे होते. कारण पाप आणि अधर्माचा त्याला सरळ अंत व नाश करायचा होता. श्री. उद्धव हे महाभारतातील व रणांगणावरचे एक मोलाचे पात्र. जणू ते भगवान श्रीकृष्णाचे प्राणसखाच. अर्जुन व श्री उद्धव हे दोन श्रीकृष्णाचे विश्वासू मित्र. ‘महाभारत’ पुन्हा अभ्यासण्याची गरज भाजपमधील मित्रांना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या