कल्याण-डोंबिवलीतील पाणीचोरांचे कंबरडे मोडणार

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पाणीबिल वसुलीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीचोरी, मनुष्यबळाची कमतरता, वाढती थकबाकी आणि वसुलीतील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाणीबिल वसुलीचा ठेका घेणाऱ्या कंपनीवर अनधिकृत नळजोडण्या तोडणे, पाणीचोरी रोखणे, थकबाकी वसूल करणे, पाणीचोरांवर खटले दाखल करण्याची जबाबदारी असणार आहे. एप्रिलपासून पाणीवसुलीची नवीन पद्धत अमलात येणार असून यामुळे पाणीचोर, चाळमाफिया, थकबाकीदारांचे कंबरडे मोडणार आहे. खासगीकरणामुळे पालिकेच्या तिजोरीत ६५ कोटी रुपये जमा होणार आहेत.

उल्हास आणि काळू नदीतून पालिका दररोज ३४५ दशलक्ष लिटर पाणी शहरवासीयाना पुरवते. दरवर्षी पालिकेला पाण्यावर सरासरी ६५ कोटी रुपये खर्च होतो. वसुली मात्र सरासरी ५५ कोटी होते. थकबाकीचे प्रमाणही वाढत आहे. याशिवाय महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता चाळ, झोपडपट्टी वसाहत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून भूमाफियांनी नळजोडण्या घेतल्या आहेत. भूमाफिया, पाणीचोर आणि पाणी विभागातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्या रॅकेटमुळे पालिकेच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा वाढत आहे. त्यातच पाणीवसुलीसाठी १७८ कर्मचारी आवश्यक असताना ११५ इतकेच मनुष्यबळ आहे. भरीस भर म्हणून २७ गावांची जबाबदारीही पालिकेवर आहे.

या सर्वांचा विचार करून पाणीबिल वसुलीचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाला महासभेने मंजुरी दिली आहे. मागील थकबाकी वसूल करणे, अनधिकृत नळजोडण्या तोडणे, पाणीचोरी रोखणे आणि जलवाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याचे महत्त्वाचे कामही पार पाडावे लागणार आहे. भूमाफिया आणि पाणीचोरांविरुद्ध काय कारवाई केली याचा प्रत्येक आठवड्याला अहवाल द्यावा लागणार आहे. खासगी ठेका घेणाऱ्या कंपनीला वार्षिक ६५ कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी साडेपाच कोटी रुपये पालिकेत जमा करावे लागणार आहेत.

नागरिकांच्या हितासाठीच निर्णय
प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. गळती रोखणे, पाणीचोरांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन पाणी दरवाढीचा प्रस्ताव महासभेत आणत होते. मात्र पाणी दरवाढीचा प्रस्ताव नामंजूर करून पाणीबिल वसुलीचे खासगीकरण करण्यात आले आहे. यामुळे चोरीच्या जोडण्या तोडल्या जातील. यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल.
– राजेंद्र देवळेकर (महापौर)

आपली प्रतिक्रिया द्या