केडीएमटी तोट्यात, व्यवस्थापकांच्या परत पाठवणीचा प्रस्ताव

35

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवा तोट्यात जाण्यास व्यवस्थापक देविदास टेकाळे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आज परिवहन सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. अशा अकार्यक्षम अधिका-याची सेवा तत्काळ खंडित करून त्यांना शासन सेवेत परत पाठवण्याचा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला.

गेल्या वर्षभरापासून परिवहन उपक्रमाचे उत्पन्न घटत आहे. नवीन गाड्याही रस्त्यावर धावत नाहीत. सदस्यानी वारंवार याबाबत प्रशासनाला कामकाजात सुधारणा करण्याचे बजावूनही काहीच फरक पडत नसल्याने आजच्या सभेत सदस्य आक्रमक झाले. परिवहन उपक्रम तोट्यात जाण्यास सर्वस्वी व्यवस्थापक देविदास टेकाळे जबाबदार असल्याचा ठपका संतोष चव्हाण, नाना यशवंतराव, राजेंद्र दीक्षित, नितीन पाटील, प्रल्हाद म्हात्रे आदी सदस्यांनी ठेवला. टेकाळे यांचा परिवहन सेवेवर कोणताही अंकुश नसल्याने प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सभेतील ठरावांची वेळेत अंमलबजावणी होत नाही. गतवर्षी परिवहनला २४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र या आर्थिक वर्षातील आठ महिन्यांत अवघे १० कोटी उत्पन्न मिळाले आहे. अकार्यक्षम अधिकारी असतील तर परिवहनचा गाडा कसा पुढे जाईल असे म्हणत सदस्यांनी टेकाळे यांच्या कारभाराचा पंचनामा केला. सदस्यांची आक्रमकता पाहून सभापती संजय पावशे यांनी टेकाळे यांना सरकारी सेवेत परत पाठवण्याचा ठराव मंजूर केला.

टेकाळे यांच्या अपयशाची ‘पंचसूत्री’

गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणे
अधिकारी – कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव
नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण वाढणे
उत्पन्नात कमालीची घट
नवीन गाड्या रस्त्यावर आणण्यात अपयशी.

आपली प्रतिक्रिया द्या