फिटनेसमुळे खेळ उंचावला: केदार जाधव

31

बंगळुरू

दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध शनिवारी ६९ धावांची वादळी खेळी करून विजयाचा शिल्पकार ठरलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवने ‘फिटनेमुळेच आपला खेळ कमालीचा उंचावलाय,’ अशी प्रतिक्रिया दिली.

३७ चेंडूंत ५ षटकार व तितक्याच चौकारांसह आक्रमक अर्धशतक झळकाविलेला पुणेकर केदार जाधव म्हणाला, माझ्या खेळात जी सुधारणा झाली त्याचे काही प्रमाणात श्रेय ‘आरसीबी’चे ट्रेनर शंकर बासू यांनाही जाते. मी सात किलो वजन घटवले. त्यामुळे सहाजिकच हालचालींचा वेग वाढला. फिटनेस एक अशी गोष्ट आहे की, आपण नुसते आरशासमोर उभे राहिलो तरी आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. ट्रेनर शंकर बासूमुळे माझ्या फिटनेसमध्ये कमालीची सुधारणा झाली असून मला स्वतःलाच मी खूप तंदुरुस्त झाल्याचे वाटते. मला संघात केवळ खेळाडू म्हणून राहायचे नाही तर मला मॅचविनर खेळाडू बनायचेय.

केदारनेही मारला हेलिकॉप्टर शॉट

ख्रिस गेल व कर्णधार शेन वॉटसन ही प्रतिभावान सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर बढती मिळालेल्या केदार जाधवने फलंदाजीची सूत्रे आपल्या हातात घेतली. १३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केदारने हेलिकॉप्टर शॉट मारून प्रेक्षकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. केदारने कार्लोस ब्रेथवेटला हा शॉट मारून चेंडूला सीमारेषेपार पाठविले.

आपली प्रतिक्रिया द्या