रंग खेळताना ठेवा तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित

82

सामना ऑनलाईन । मुंबई

होळीच्या दिवशी पाण्यापासून दूर राहणं जरा कठीणच आहे. रंग खेळताना पाण्याने तुम्ही तर रंगून जाल पण, तुमचा स्मार्टफोन या सगळ्या गडबडीत खराब होऊ शकतो. तेव्हा जशी रंगांमुळे त्वचा आणि केस खराब होऊ नयेत याची काळजी घेता, तशीच स्मार्टफोनचीही काळजी घ्या. तुमच्या स्मार्टफोनला रंग आणि पाण्यापासून दूर राखण्यासाठी या काही स्मार्ट टिप्स-

१. रंग खेळताना फोनवर बोलण्यासाठी ब्ल्यूटुथ किंवा इअरफोन्स वापरा. कारण, रंग, पाण्याचा फुगा किंवा पिचकारीतला रंग तुमच्यावर कसाही फेकला जाऊ शकतो. अशावेळी ब्ल्यूटुथ किंवा इअरफोन्सचा वापर जास्त सुरक्षित आहे.

२. बाजारात काही स्मार्टफोन्ससाठी वॉटरप्रुफ कव्हर्स उपलब्ध आहेत. अशा प्रकारची कव्हर्स बऱ्याच प्रमाणात पाण्याचा प्रभाव रोखून धरू शकतात. आयफोन, सॅमसंग, सोनी एक्सपीरिया, एचटीसी या ब्रँड्सच्या काही स्मार्टफोन्ससाठी ही कव्हर्स मिळू शकतील.

३. आजकाल बरेच स्मार्टफोन्स हे स्क्रॅचप्रुफ असतात. मात्र, अशी स्क्रॅचगार्ड्स ही महाग असतात. तसंच, रंग किंवा गुलालाने त्यावर डाग पडू शकतात. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी एखादं स्वस्तातलं स्क्रॅचगार्ड तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला लावू शकता.

४. प्लास्टिक किंवा झिप पाऊचचा वापर करा. अशी झिप पाऊचेस बाजारात अतिशय कमी किमतीला उपलब्ध आहेत. पावसाळ्यात ज्या प्रकारे फोन्सना झिप पाऊचेस वापरली जातात, तसंच होळीतही तुम्ही वापरू शकतात. झिप पाऊच हवाबंद असल्यामुळे पाणी आत शिरत नाही.

५. या सगळ्या उपायांशिवाय अजून एक भन्नाट आयडिया वापरून तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता. बाजारात मिळणाऱ्या रबरी फुग्यांचा वापर तुम्ही एखाद्या पिशवीसारखा करू शकता. या रबरी पिशवीमुळे तुमच्या फोनचे इअरफोन आणि युएसबी स्लॉटही संपूर्ण पॅक होतात. त्यामुळे पाणी किंवा धूळ यांपासून फोन सुरक्षित राहतो.

आपली प्रतिक्रिया द्या