केजरीवाल दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्री होणार ?

सामना ऑनलाईन । मोहाली
दिल्लीकरांना मोठी स्वप्न दाखवून मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल आता दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहेत. पंजाबमध्ये मोठा विजय मिळाल्यास सलग पाच वर्षांसाठी पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या मार्फत जाहीर केली.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मतदान म्हणजे अरविंद केजरीवाल यांना मत देण्यासारखेच आहे असा विचार करुन मतदान करण्याचे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी केले आहे. सिसोदिया यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यास दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी केजरीवाल यांनी केल्याचे तर्क राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत.
प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन देऊन दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या केजरीवाल यांनी पहिल्यांदा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता. मात्र लवकरच त्यांनी पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन केंद्र सरकारशी मतभेद झाल्याचे सांगत राजीनामा दिला होता. केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे एका वर्षाच्या आत दिल्लीत दुसऱ्यांदा निवडणूक झाली. दुसऱ्यांदा झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले तरी पूर्ण राज्याचा दर्जा नसल्यामुळे केजरीवालांचे मन अद्याप दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रमलेले नाही. आता दिल्लीकरांना सोडून पंजाबमध्ये पाच वर्ष मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न केजरीवाल बघत आहेत.
शीख नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पंजाबची निवडणूक लढवणे केजरीवाल यांनी टाळले आहे. मात्र निवडणुकीत मोठा विजय मिळाला तर दिल्लीचे मुख्यमंत्री पद सोडून पंजाबमध्ये मुख्यमंत्री होण्याची तयारी केजरीवाल यांनी केली आहे.