शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे केईएममध्ये ‘पेडबेड’,खासगी वैद्यकीय सुविधा माफक दरात

मुंबई महापालिकेच्या परळ येथील ‘केईएम’ रुग्णालयात लवकरच खासगी वैद्यकीय सुविधा ‘पेड बेड’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमात सुरुवातीला 17 बेड सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून माफक दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी पाठपुरावा केला होता.

मुंबई महापालिकेची ‘केईएम’, नायर, शीव आणि कूपर अशी मोठी रुग्णालये आहेत. शिवाय कस्तुरबा विशेष विषाणू रुग्णालयासह 16 उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आहेत. या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळत असल्याने देशभरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे बहुतांशी वेळा पालिकेच्या सर्व बेडवर रुग्ण दाखल असतात. अनेक वेळा रुग्णांना मुंबईतील खासगी रुग्णालयांनाच पसंती द्यावी लागते. त्यामुळे पालिका रुग्णालयांत खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर 10 टक्के ‘पेड बेड’चा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी सप्टेंबर 2020 मध्ये केईएममध्ये नव्याने उपलब्ध होणाऱया इमारतीमध्ये खासगी बेड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली होती.