स्वयंसेवकांना 35 लाखांचे विमा संरक्षण, केईएममध्ये लवकरच कोव्हिशिल्डची चाचणी

केईएम आणि नायर रुग्णालयात होणाऱया कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीसाठी येणाऱया स्वयंसेवकांना 35 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असून एकूण 10 कोटी रुपयांचे समूह विमा संरक्षण मिळणार आहे. येत्या आठवडाभरात केईएम रुग्णालयात कोव्हिशिल्डची मानवी चाचणी सुरू होणार आहे. केईएममध्ये आतापर्यंत 350 स्वयंसेवकांनी नावांची नोंदणी केली आहे.

कोरोनावर ऑक्सफर्ड आणि सिरम इनस्टियटय़ूटने कोव्हिशिल्ड ही लस शोधली असून त्याची लंडनमध्ये पहिली आणि दुसरी चाचणी यशस्वी झाली असून मुंबईसह देशभरात दुसरी आणि तिसरी चाचणी होणार आहे. पुण्यात ‘कोव्हीशिल्ड’ द्यायला सुरुवात झाली होती. मात्र, लंडनमध्ये तिसऱया टप्प्यात एका स्वयंसेवकाची तब्येत बिघडल्याने हिंदुस्थानातही कोव्हिशिल्डच्या चाचण्या थांबवण्यात आला होत्या तर महाराष्ट्र आणि मुंबईतील स्वयंसेवकांना विमा संरक्षण देण्यावरून सिरमकडून रक्कम निश्चित झाली नव्हती. मात्र, आता या दोन्ही बाबी मार्गी लागल्या आहेत. केईएम रुग्णालयात आतापर्यंत 350 स्वयंसेवकांची नोंद झाली आहे. यातील ज्या व्यक्ती चाचणीसाठी पात्र ठरतील, अशा 160 जणांना कोव्हिशिल्ड दिली जाणार आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

नायरला तारीख नाही
नायर रुग्णालयातील मानवी चाचणीला अद्याप ‘आयसीएमआर’ने तारीख दिलेली नाही. त्यामुळे नायर रुग्णालयातील मानवी चाचणीला आणखी एक आठवडा लागू शकतो. नायर रुग्णालयात आतापर्यंत 110 स्वयंसेवकांची नोंद झाली आहे. त्यातून 100 पात्र स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे. आयसीएमआरने तारीख दिली आणि लस उपलब्ध झाली की, लगेच मानवी चाचणीला सुरुवात करू, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या