केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या, इंजेक्शनमधून घेतले विष

2500

परळच्या केईएम रुग्णालयात खळबळजनक घटना घडली. रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रणय जयस्वाल (28) या निवासी डॉक्टरने विषारी इंजेक्शन मारून आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास रुग्णालय परिसरातील हॉस्टेलच्या गच्चीत प्रणय यांचा मृतदेह सापडला, परंतु त्यांनी आत्महत्या का केली त्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसून कौटुंबिक कारणातून प्रणय यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. भोईवाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

मूळचे अमरावतीचे असलेले प्रणय जयस्वाल हे केईएम रुग्णालयात जनरल सर्जरी विभागात सीनियर रेसिडेन्स म्हणून कार्यरत होते. त्यांनी मास्टर्सचे अंतिम वर्षाचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. आरएमओ हॉस्टेलमध्ये प्रणय गेल्या तीन वर्षांपासून डॉ. समर्थ पटेल यांच्या सोबत एकाच खोलीत राहत होते. शुक्रवारी रात्री डॉ. प्रणय रूमवर न आल्याने त्यांच्या सहकाऱयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर शनिवारी सकाळी हॉस्टेलच्या गच्चीवर डॉ. प्रणय मृतावस्थेत सापडले. त्यांनी विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी डॉ. प्रथम यांच्याकडे झालेल्या चौकशीत डॉ. प्रणय हे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वैफल्यग्रस्त होते असे समोर आले. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या